शेतकऱ्याने लढवली शक्कल; शेतपिकांच्या सुरक्षेसाठी साडीचे कुंपण

file photo
file photo


यवतमाळ : पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत शेतकऱ्यांना किती अडचणींचा सामना करावा लागतो, हे त्यांनाच माहीत आहे. वनक्षेत्राला लागून असलेल्या शेतामधील पिकांची सुरक्षा करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला अक्षरशः फेस येतो. वन्यप्राण्यांनी शेतात येऊन नुकसान करू नये, यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला साडीचे कुंपण करण्याची नवीन युक्ती शोधून काढली आहे.

शेतात हरिण, रोही, नीलगाय, रानडुक्कर आदी वन्यप्राणी नेहमीच धुडगूस घालतात. हातातोंडाशी आलेले पीक रात्रभरात वन्यप्राणी तुडवतात. पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांना रक्ताचे पाणी करावे लागते. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी आपला जीव धोक्‍यात टाकून रात्र जागली करतात. थोडे जरी दुर्लक्ष झाल्यास वन्यप्राणी शेतात शिरून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरतात. वनक्षेत्राला लागून शेती करणारे शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे मेटाकुटीस आले आहेत.

पिकांची सुरक्षा करण्यासाठी शेतकरी विविध युक्‍त्या करून थकले आहेत. बुजगावणे, डांबरगोळी, सोलर कुंपण, तार बांधून वीजप्रवाह सोडणे, फटाके फोडणे, वाघाची डरकाळी, ओरडण्याचा आवाज आदी पर्याय वापरले जातात. हे आवाज ऐकणे वन्यप्राण्यांना नित्याचे झाल्याने त्याचा फायदा होताना दिसत नाही. रानडुकरांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून, मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी करीत असल्याचे शेतकरी सांगतात.

वन्यप्राणी करतात शेतीचे नुकसान

यंदा अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. सुरुवातीपासून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परतीच्या पावसाने केलेले नुकसान भरून निघणारे नाही. आता शेतात कपाशी कशीबशी उभी आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये. थोडे पीक घरात आल्यास तितकाच आधार होईल, या अपेक्षेने शेतकरी शेतीला साडीचे कुंपण घालत आहेत. वन्यप्राणी पिकांचे अतोनात नुकसान करीत असल्याच्या तक्रारी अनेकदा शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केल्या आहेत. मात्र, संबंधित विभागाकडून गंभीरतेने दखल घेतली जात नाही, असा आरोप होत आहे.

कमी किमतीत खरेदी

शेतीला साडीचे कुंपण करण्यासाठी शेतकरी घरातील जुने कपडे वापरतात. मात्र, ते कमी पडत असल्याने कमी किमतीत मिळणाऱ्या साड्या शहरातून विकत आणून त्यांचे कुंपण घातले जाते. त्याचाही आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांवर बसतो.

वीजतारेमुळे जीव धोक्‍यात

वन्यप्राणी शेतात येऊ नये, म्हणून बहुतांश शेतकरी शेताला तारेचे कुंपण करून त्यात जिवंत विद्युत प्रवाह सोडतात. शेतात ये-जा करणाऱ्या मजुरांना त्याबाबत माहिती राहत नाही. अनेकदा शेतकरी दिवसा वीजप्रवाह बंद करण्याचे विसरतात. त्यात नाहक शेतात आलेल्या नागरिकाला आपला जीव गमावावा लागतो. यंदा जिल्ह्यात असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे यंदा शेतीला साडीचे कुंपण करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com