अरेरे! फक्त अडीच हजारांसाठी फिरली पोलिस हवालदाराची नियत...वाचा पुढे काय झाले ते

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जून 2020

गुन्हा टाळाण्यासाठी मनोहर पाटीलने तीन हजारांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचेच्या मागणीसंदर्भात खात्री केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून सापळा रचण्याचा निर्णय घेण्यात आला.

नागपूर : पिचलेल्या आणि पीडितांना न्याय देण्याचे आणि गुन्हेगारांना न्यायदेवतेसमोर उभे करून त्यांना शिक्षा होईल, असा तपास करण्याची जबाबदारी पोलिसांची असते. बलात्कारासारखा गुन्हा असेल तर हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज असते. परंतु, अशाही प्रकरणात शेण खाण्याची प्रवृत्ती असणारे काही पोलिस कर्मचारी असतात जे अख्ख्या पोलिस दलाची प्रतिमा मलिन करतात. असाच एक पोलिस हवालदार केवळ अडीच हजारांच्या लाचेपोटी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
 बलात्काराचा गुन्हा टाळण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली. नागपुरातील कपिलनगर पोलिस ठाण्याच्या परिसरातच सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर कपिलनगर ठाण्यासोबतच संपूर्ण पोलिस दलातच खळबळ उडाली.

वाचा- नागपूरकरांनो सावधान! चोरटे पुन्हा आले फॉर्ममध्ये

मनोहर पाटील (42) असे अटकेतील हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणातील 42 वर्षीय तक्रारदार मोमिनपुऱ्यातील रहिवासी आहे. कपिलनगर ठाण्याच्या हद्दीतील एका अत्याचाराच्या प्रकरणात तक्रारदाराच्या नातेवाइकाचे नाव समोर आले. गुन्हा टाळाण्यासाठी मनोहर पाटीलने तीन हजारांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचेच्या मागणीसंदर्भात खात्री केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून सापळा रचण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने मनोहर पाटील यांच्यासोबत रकमेच्या तडजोडीसंदर्भात चर्चा केली.

अडीच हजारात प्रकरण थांबविण्याचे मनोहर पाटीलने मान्य केले. शुक्रवारी सायंकाळी कपिलनगर ठाण्यातच सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने पाटीलजवळ जाऊन त्याच्या हातात अडीच लाखांची रोख दिली. रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडप टाकून मनोहर पाटीलला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे कपिलनगर ठाण्यात एकच खळबळ उडाली. अगदी काही क्षणातच संपूर्ण पोलिस दलाच्या वर्तुळात या कारवाईची माहिती पसरत गेली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पाटीलला अटक केली आहे. उशिरा रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्यासह त्याच्या घरी झाडाझडती सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Constable caught while accepting bribe