पोलिसच देतात सूचना, पुढील आदेशापर्यंत अवैध धंदे बंद ठेवा!

सतीश दहाट
Friday, 9 October 2020

२५ सप्टेंबरला पोलिस आयुक्तांनी पत्रकारपरिषद घेण्याअगोदर सर्व ठाणेदारांची बैठक घेऊन तंबी दिली व सर्व अवैध धंदे बंद करण्याच्या मौखिक सूचना दिल्या. मात्र, नवीन पोलिस ठाण्याकडून पोलिस ठाण्याच्या सीमेत अवैध दारू विक्रेते, जुगार खेळविणारे, गांजा विकणारे यांना पोलिस ठाण्यात बोलावून सूचनापत्र देण्यात आले.

कामठी (जि. नागपूर) : मागील दोन आठवड्यापासून पोलिस उपायुक्तांच्या रडारवर असलेल्या कामठीच्या अवैध धंदे चालकांना छापा पडणार असल्याची सूचना पूर्वीच मिळत आहे. या धंदेवाल्यांना गुप्त माहिती पोहोचविणारे कोण पोलिस कर्मचारी आहेत, याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे.

नागपूर शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंदे करणाऱ्यांसह गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर आळा बसविण्याचे कार्य हातात घेतले आहे. मात्र, काही बोटावर मोजण्याइतक्या कर्मचाऱ्यांमुळे आयुक्तांचे प्रयत्न अयशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. कामठीत अवैध जनावरांची वाहतूक, कत्तलखाना, सट्टा, जुगार, गांजा इत्यादी प्रकारचे अवैध धंदे जोरात सुरू असतात.

सविस्तर वाचा - फिरायला नेले आणि अडीच लाखांत विकले; प्रियकरानेच केली प्रेयसीची विक्री

जुने पोलिस ठाण्याच्या सीमेतील अवैध धंदे मंगळवारी दुपारपासून अचानक बंद करण्यात आले. त्याचे कारण असे की शहर पोलिस गुन्हे शाखेचा छापा पडणार असल्याची माहिती जुने पोलिस ठाण्यातून मिळाली असल्याचे अवैध धंदे करणाऱ्या एक व्यक्तीने नाव न सांगणाच्या शर्तीवर सांगितले. आज शहरात सगळीकडे सट्टापट्टी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली, ही बाब जुने पोलिस ठाण्याची झाली. नवीन पोलिस ठाण्याची तर वेगळीच गाथा आहे.

२५ सप्टेंबरला पोलिस आयुक्तांनी पत्रकारपरिषद घेण्याअगोदर सर्व ठाणेदारांची बैठक घेऊन तंबी दिली व सर्व अवैध धंदे बंद करण्याच्या मौखिक सूचना दिल्या. मात्र, नवीन पोलिस ठाण्याकडून पोलिस ठाण्याच्या सीमेत अवैध दारू विक्रेते, जुगार खेळविणारे, गांजा विकणारे यांना पोलिस ठाण्यात बोलावून सूचनापत्र देण्यात आले. त्या सूचनापत्रात नमूद असलेल्या प्रमाणे, ‘तुमच्याकडे कोणतेही अवैध काम सुरू असल्यास बंद करावे, असे न केल्यास तुमच्यावर कार्यवाही करण्यात येईल’ असे लिहिले होते. आता सांगा काय म्हणावे याला?

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The police give instructions to illegal traders