पोलिस उपनिरीक्षकास दंडाची नोटीस; मारहाण प्रकरणी लकडगंजचे ठाणेदार हिवरेंना समज 

अनिल कांबळे 
Tuesday, 20 October 2020

अंकिता शाह या तुलसी अपार्टमेंट, टेलिफोन एक्सचेंज चौकात राहतात. मोकाट कुत्र्यांच्या अधिकारांसाठी त्या अनेक वर्षांपासून लढा देत असून करोनामुळे देशात टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर मोकाट कुत्र्यांना अन्न व पाणी देण्याची मोठी समस्या निर्माण झाली.

नागपूर ः  मोकाट कुत्र्यांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या व माहिती अधिकार कार्यकर्त्या अ‍ॅड. अंकिता शाह यांना लकडगंज पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आल्याचा प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून समज देण्यात आली आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षकास १ हजार रुपयांचा दंड का ठोठावण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावून दोन महिला शिपायांना प्रत्येकी ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा करण्यात आली. 

अंकिता शाह या तुलसी अपार्टमेंट, टेलिफोन एक्सचेंज चौकात राहतात. मोकाट कुत्र्यांच्या अधिकारांसाठी त्या अनेक वर्षांपासून लढा देत असून करोनामुळे देशात टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर मोकाट कुत्र्यांना अन्न व पाणी देण्याची मोठी समस्या निर्माण झाली. त्यावेळी त्यांनी आपल्या इमारतीच्या समोर रस्त्याच्या कडेला कुत्र्यांसाठी एक पात्र ठेवले. या पात्रावरून त्यांचे एकाशी भांडण झाले. त्याची तक्रार देण्यासाठी २५ मार्च २०२० ला सायंकाळी ७.३० वाजता त्या लकडगंज पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना पोलिसांकडून मारहाण झाली. 

अधिक माहितीसाठी - Video : हृदयाला फुटले पाझर; जेव्हा विधवा म्हणाली, ‘घरचा कर्ता पुरुष गेल्यावर जगायच कसं’

या घटनेचा व्हीडीओ सहा महिन्यांनी सोशल मिडियावर प्रसारित झाला होता. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी समज दिली. तसेच वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक भावेश कावरे यांना एक हजाराचा दंड का ठोठावण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तर महिला पोलीस शिपाई चेतना बिसेन आणि माधुरी खोब्रागडे यांना ५०० रुपयांचा दंड करण्यात आला असल्याची माहिती आहे.

 या संदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला असून मी पदभार घेण्यापूर्वीच प्रकरणाची चौकशी झाली होती. त्या चौकीत तत्कालीन पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली, असे सांगितले.

सविस्तर वाचा - चाळीसचे फेडले ८५ लाख; तरी सावकार करायचा १३ लाखांची मागणी; त्रास असह्य झाल्याने घेतला गळफास

पुन्हा व्हावी चौकशी 

हिवरे यांना समज देणे किंवा ५०० रूपये दंड दिल्यामुळे मला न्याय मिळाला नाही. या प्रकरणाची पुन्हा पारदर्शक चौकशी व्हावी. ही कारवाई केवळ दिखावा आहे. पोलिस ठाण्यात महिलेला मारहाण केल्यास ५००-१००० रूपये दंड केल्यास प्रकरण थंडबस्त्यात जाते, असा चुकीचा संदेश यामुळे जाईल. जोपर्यंत दोषी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य शिक्षा होणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.  -ॲड अंकिता शहा

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police inspector got notice for fine in Nagpur