Video : हृदयाला फुटले पाझर; जेव्हा विधवा म्हणाली, ‘घरचा कर्ता पुरुष गेल्यावर जगायच कसं’

The grief of the family killed in the tiger attack in Chandrapur
The grief of the family killed in the tiger attack in Chandrapur

राजुरा (जि. चंद्रपूर) : दोन महिन्यांपूर्वी विरूर वनपरिक्षेत्रअंतर्गत वाघाच्या हल्ल्यात बळी पडलेल्या वासुदेव कोंडेकर यांच्या कुटुंबीयासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. १८ ऑगस्ट २०२० रोजी वासुदेव कोडेकर यांच्यावर वाघाने हल्ला केला होता. यात ते घटनास्थळीच ठार झाले. त्यानंतर सरकारतर्फे एक लाख नगदी मदत देण्यात आली. तसेच उर्वरित रक्कम बँकेत जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. या घटनेला आज दोन महिने होत आहे. त्यांच्या कुटुंबीयांची व्यथा जाणून घेण्यासाठी ‘सकाळ’ने प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी अतिशय विदारक चित्र समोर आले.

वाघाच्या हल्ल्यात घरचा कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नवेगाव येथील वासुदेव कोंडेकर यांच्या नावाने तीन एकर शेती आहे. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर वाघाच्या दहशतीमुळे शेतावर जाणेही बंद आहे. घरात मृत वासुदेव कोंडेकर यांच्या पत्नी ताराबाई कोंडेकर मुलगा, सून व नातू असा परिवार राहतो. घराचा कर्ता पुरुष असल्यामुळे कुटुंबाला फार मोठा आधार होता. ते गेल्यामुळे कुटुंबावर मोठी आपत्ती आलेली आहे.

सरकारकडून मिळालेला पैसा आमच्या काय कामाचा. घरच्या व्यक्तीचा जीव महत्त्वाचा आहे. घरातला कर्ताधर्ता गेल्यावर पुढे जगावे कसे याचा संघर्ष आमच्यासमोर आहे. सरकारचे नियम असल्यामुळे मिळालेला पैसा बँकेत आहे. साधा दवाखान्यात जातो म्हटलं तरी शंभर रुपये हातात नाही. अशा स्थितीत आम्ही जगत आहोत. कुटुंबातील सदस्यांना धीर देत डोळ्यात अश्रू साठवत ताराबाईने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

राजुरा वनपरिक्षेत्रअंतर्गत उद्धव मारोती टेकाम (कुटुंब प्रमुख) चुनाळा हे ६ मार्च २०२० रोजी वाघाच्या हल्यात ठार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ताईबाई टेकाम, मुलगी सुनीता टेकाम तिच्यासोबत जीवन जगत आहे. घरी शेती किती आहे, कोणाचे नावाने आहे हे यांना माहीत नाही.

मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या कुटुंबीयांसमोर घरचा कर्ता पुरुष गेल्यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. कुटुंबाची जबाबदारी आता महिलांवर आलेली आहे. कोरोना संकटात हाताला काम नाही व जगण्यासाठी पैसा नाही. अशी अवस्था या कुटुंबीयांची आहे. सरकारचा पैसा नको, आम्हाला आमच्या कर्त्या पुरुषाचा जीव पाहिजे, अशी आर्त हाक विधवा महिला करीत आहेत.

वाघाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या कुटुंबीयातील प्रमुखांना वन विभागाने शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. या सर्व प्रकरणात जबाबदार असलेल्या दोन्ही निष्क्रिय वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे. वाघाला ठार मारावे यासह अनेक मागण्या घेऊन १२ ऑक्टोबर रोजी शेतकरी-शेतमजूर समन्वय समितीने राजुरा येथे चक्काजाम आंदोलन केले होते.

आंदोलनाचे नेतृत्व समितीचे आयोजक चेतन जयपूरकर व बापूराव मडावी यांनी केले आणि सरकारकडे निवेदन देऊन पीडित कुटुंबीयांच्या मागण्या तात्काळ मंजूर करण्याबाबत मागणी केली. चेतन जयपूरकर यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन व्यथा जाणून घेतली.

अन्यथा बेमुदत उपोषण
वन विभागाला सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा. वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या मागण्यांचे पूर्णता करण्यात यावी. दोन्ही वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे. अन्यथा वाघाच्या हल्ल्यातील कुटुंबीयांसोबत बेमुदत उपोषण करण्यात येईल.
- चेतन जयपुरकर,
समन्वयक, शेतकरी शेतमजूर समन्वय समिती, टेबूरवाई

जगावे कसे असा प्रश्न
घरातल्या कर्त्या पुरुषाचा जीव गेला. सरकारचा पैसा कोणत्या कामाचा. एक लाख रुपये हातात मिळाले. डॉक्टरकडे जाण्यासाठी शंभर रुपये नाही. बँकेचे काम करण्यासाठी जातो म्हटले तर पैसा नाही. घरचा माणूस गेल्यावर जनावरे विकून कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत आहोत. घरचा कर्ता माणूस गेल्यावर शेतावर जाणे बंद आहे. जगावे कसे असा प्रश्न आमच्यासमोर आहे‌.
- ताराबाई वासुदेव कोंडेकार, नवेगाव

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com