ओल्या पार्ट्या अन्‌ रात्र...

अनिल कांबळे
Sunday, 29 December 2019

31 डिसेंबरला सकाळपासून वाहतूक शाखेचे विशेष पथके कारवाईच्या अभियानास सुरुवात करणार आहे. दारू पिऊन वाहन चालविल्यास केवळ कारवाई किंवा दंड करून सोडून देण्यात येणार नसून त्याची संपूर्ण रात्र पोलिस ठाण्यातील कोठडीत जाणार आहे. 

नागपूर : अनेकांनी "थर्टी फर्स्ट' साजरा करण्यासाठी नियोजन केले आहे. ओल्या पार्ट्या आणि डीजे वाजवून नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बरेच जण उत्सुक आहेत. मात्र, अशा पार्ट्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे. दारूची झिंग चढवून वाहन चालविणारे आणि डीजे वाजविणाऱ्यांची रात्र थेट पोलिस ठाण्यात जाणार असल्याचे संकेत पोलिस आयुक्‍तांनी दिले आहेत. त्यामुळे "थर्टी फर्स्ट सेलेब्रेशन'ची तयारी करण्यापूर्वी पोलिसांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेणे आवश्‍यक आहे. 

क्लिक करा - व्वारे डॉक्‍टर! युवतीला केली शरीरसुखाची मागणी

गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता पोलिसांनी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या तरुणाईवर लगाम कसण्याचे ठरविले आहे. गेल्या वर्षीच्या शेवटच्या दिवशी तीन हत्याकांड उघडकीस आले होते. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली होती. तसेच कायदा व सुव्यवस्थेवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे यावर्षी पोलिस कोणतीही जोखीम न पत्करता कडक बंदोबस्त करणार आहे.

31 डिसेंबरला सकाळपासून वाहतूक शाखेचे विशेष पथके कारवाईच्या अभियानास सुरुवात करणार आहे. दारू पिऊन वाहन चालविल्यास केवळ कारवाई किंवा दंड करून सोडून देण्यात येणार नसून त्याची संपूर्ण रात्र पोलिस ठाण्यातील कोठडीत जाणार आहे. 

तलाव, बगिच्यावर नजर

फुटाळा, अंबाझरी, सोनेगाव, गांधीसागर इत्यादी तलावांसह महाराजबाग, जपानी गार्डन, धंतोली, सदर यासह अन्य बगिच्यांवर पोलिसांच्या विशेष पथकाची नजर असणार आहे. छेडखानी, शेरेबाजी रोकण्यासाठी महिला पोलिस साध्या वेशात फुटाळा अंबाझरी तलावावर तैनात असणार आहे. तसेच दामिनी पथकेसुद्धा तैनात करण्यात आले आहेत.

अधिक वाचा - तो पंचावन वर्षांचा ती नऊ वर्षांची अन्...

स्टंटबाजांवर होणार कारवाई

झिगझॅग वाहन चालविणे आणि स्टंटबाजी करण्यावर पोलिसांनी वॉच ठेवला आहे. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी अनेक "बाईक लव्हर्स' फुटाळ्यावर स्टंटबाजी करतात. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होते तसेच चालक किंवा वाटसरूंना गंभीर दुखापतही होऊ शकते. अपघात होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला वाहतूक पोलिसांनी दिला आहे. 

पुढच्या वर्षापासून बंद

पुढच्या वर्षापासून दारू बंद असा संकल्प अनेक जण करतात. त्यामुळे थर्टी फर्स्टला शेवटचा पेग असे म्हणून नव्या वर्षात दारूच्या बाटलीला स्पर्शही न करण्याचा संकल्प अनेक जण करतात. मात्र, नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे "नाईन्टी' घेऊन आणि पुन्हा उद्यापासून बंद असा संकल्प करणाऱ्यांची संख्याही खूप आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police look at Thirty First party