बुलेट सायलेन्सरने फटाके फोडाल तर खबरदार; पोलिसांचे तुमच्यावर लक्ष

Police take action against bullets bikers
Police take action against bullets bikers

नागपूर : बुलेटने फटाके फोडत धूम ठोकणाऱ्या वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या नाकी नऊ आणले आहे. तसेच रस्त्याने पायी चालणाऱ्यांनाही दचकविण्यासाठी बुलेटस्वार कानठळ्या फोडणारे फटाके वाजवितात. बुलेटस्वारांना लगाम लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष अभियान राबविले असून ५२ बुलेटस्वारांना पोलिसांनीच फटाके लावले आहेत.

दीड ते दोन लाखांच्या बुलेटला मॉडीफाईड करून मोठा आवाज करणाऱ्या सायलेन्सर लावण्याची युवकांमध्ये क्रेझ आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक बुलेटचालक कानठळ्या बसविणारा ‘फट्ट’ असा आवाज काढून शायनिंग मारत होते. या बुलेट आणि रेसिंग बाईकस्वार धमाकेदार आवाज काढत शहरात धुडगूस घालण्याचे काम करताना दिसून येतात. 

यामध्ये प्रामुख्याने गर्दीत जाऊन शहरात चार ते पाच बुलेटस्वार फटाके फोडून अनेकांना दचकविण्याचे काम करताना दिसून येतात. त्यामुळे अचानक आलेल्या कर्णकर्कश आवाजाने बरेचदा इतर बाईकस्वारांचे गंभीर अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय परिसरातील सामान्यांना त्याचा मोठा त्रास होतो आहे.

बुलेटमधून अशा प्रकारचा कर्णकर्कश आवाज काढणे नियमबाह्य आहे. यातून वाहतूक पोलिसांनी मंगळवारी विशेष मोहीम राबवून ५२ बुलेट चालकांवर कारवाई केली. या कारवाईमुळे बुलेटमधून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या तरुणांवर लगाम लावणे शक्‍य होणार आहे. वाहतूक पोलिस यापुढेही कारवाईचा धडाका सुरू ठेवणार आहे. त्यामुळे नियम पाळा दंड टाळा असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांनी केले आहे.

‘फॅन्सी नंबर प्लेट'वरही कारवाई

वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे अनेकदा वाहनांचा नंबर कळत नाही. एखादा अपघात झाला किंवा अपघात सदृश परिस्थिती निर्माण झाली तसेच चेनस्नॅचिंगसारखा अपराध करून आरोपी पळून जातात. त्याचा नंबर नागरीकांना नीट टिपतादेखील येत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी मोहीम राबवून बुलेटप्रमाणेच जवळपास ९० फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनचालकांवर त्या अनुषंगाने कारवाई केली.
 

‘ब्लॅक फिल्म’ लावणाऱ्यांचे शतक

शहरात ब्लॅक फिल्म लावून काही कारचालक काळेधंदे करतात. तसेच गुन्हेगार प्रवृत्तीचे युवक काळ्या फिल्म लावून बिनधास्त शहरात फिरतात. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी ब्लॅक फिल्म वापरणाऱ्या कारचालकांवर पोलिस कारवाई करीत आहेत. पोलिसांनी एकाच दिवसात १०२ कारवर धडाकेबाज कारवाई केली.

संपादन  : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com