रेल्वे प्रवासादरम्यान झाला पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू; उत्तरीय तपासणीदरम्यान आढळले कोरोना पॉझिटिव्ह 

police who dead in railway found corona positive in wardha
police who dead in railway found corona positive in wardha

कामठी (जि. नागपूर)  : मुंबईहून विदर्भ एक्सप्रेसने वर्धेला येत असलेल्या प्रवासी पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास कामठी रेल्वे स्टेशनवर उघडकीस आली. पोलिसाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निष्पन्न झाल्याने त्यांच्या पार्थिवावर कुटुंबीयांच्या उपस्थितीत कामठी येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय उत्तमराव आंबटकर (५५) वर्धा येथील रहिवासी असून, तेथेच मुख्यालयात पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. कार्यालयीन कामानिमित्त मुंबईला गेले होते. गुरुवारी मुंबईवरून विदर्भ एक्स्प्रेसने वर्ध्याला परतीच्या प्रवासाकरिता निघाले असता रात्री झोपेत त्यांना हृदयविकाराचा धक्का येऊन त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे.

ते झोपेतच असताना वर्धा येथून विदर्भ एक्सप्रेस नागपूर स्टेशनवर आली. त्यानंतर विदर्भ एक्सप्रेस कामठीमार्गे गोंदियाला रवाना झाली. दरम्यान, तिकीट निरीक्षक यांनी डब्यातील प्रवाशाचे तिकीट तपासत असताना आंबटकर झोपलेले दिसले. त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी वरिष्ठांना सूचना दिली व विदर्भ एक्सप्रेस कामठी रेल्वे स्टेशनवर थांबवून सदर प्रवाशाची चौकशी केली असता ते मृत दिसून आले लगेच घटनेची माहिती कामठी रेल्वे पोलिस चौकीला दिली.

हेडकॉन्स्टेबल बाबूलसिंग ठाकूर सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन प्रेत कामठी रेल्वे स्टेशनवर उतरून पुढील तपासणीकरिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यांची कोरोना चाचणी केली असता सदर मृतक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. आंबटकर यांच्या खिशातील आधार कार्ड व ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटल्याने नातेवाइकांना व वर्धा येथील पोलीस हेडक्वार्टरला माहिती देण्यात आली. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल बाबुलसिंग ठाकूर करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com