इचिन, कधी जाईल "तिचा' नेमच राहिला नाही !

संदीप गौरखेडे
शनिवार, 13 जून 2020

पावसाळा आली की "तिचे' असे वागणे ठरलेलेच आहे. थोडी हवा सुटली की "ती' लगेच "गुल' होते. अशावेळी "तिच्या' अशा वागण्याने हरेकाचे जिणे हराम झाले आहे. बरं अधिका-यांकडे "तिची' तक्रार घेउन गेल्यावर अधिकारीही तिच्या अनुपस्थितीची अनेक कारणे सांगून शेतकरी, ग्राहकांना हुसकावून लावतात. "तिच्या' वागण्यावर मंत्री महोदयांनी आळा घातला तर फार म्हणजे फारच बरे होईल, असे वाटते.

कोदामेंढी (जि.नागपूर) : टाळेबंदीच्या काळात वीजपुरवठा अखंडित सुरु ठेवण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सर्व वीज कंपन्यांना दिला. आता टाळेबंदी थोड्या प्रमाणात शिथिल झाली. मात्र विजेचा लपंडाव इतका वाढला की कधी जाईल, याचा नेम राहिला नाही.

हेही वाचा : अबब ! माया झाली "बारा' बछडयांची माय !!

"तिच्या' जाण्याची नाना कारणे!
अरोली वीजवितरण कंपनीद्वारे जवळपास चाळीस ते पन्नास गावाला विजेचा पुरवठा केला जातो. येथे अकरा फिडर कार्यान्वित असून कधी कोणत्या फिडरवर बिघाड होईल हेही सांगता येण्यासारखे नाही. कोदामेंढी फिडरवर मोजक्‍या गावात वीजपुरवठा जरी होत असला तरी वारंवार येथील विद्युत पुरवठा
खंडित होण्याचे प्रकार अधिक प्रमाणात सुरु आहे. झाडांची कटिंग, ब्रेकडाऊन, ट्रान्सफार्मर दुरुस्ती व नवीन लावणे, वरून गेली, फेज गेला, केबल लावणे, तार जोडणे, वादळ वारा आणि पावसामुळे, इन्सुलेटर फुटला, गस्त सुरु आहे, काम सुरु आहे, अशी नानातऱ्हेची कारणे पुढे करीत दिवसागणिक पंधरा ते वीसदा वीज पुरवठा खंडित होत असतो. कधी काळी तर महिनाभर बंद ठेवण्याची जणू कंपनीला मुभाच दिली आहे.

आणखी वाचा : धंदयावर बसण्याची धमकी देणारी "लुटेरी दुल्हन' प्रीती दास पोलिसांच्या जाळयात

ग्राहकावर मात्र भूर्दंड
वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे आणि विजेच्या कमी अधिक दाबामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. यामुळे संगणक, फ्रिज, वाटर फिल्टर, कुलर, पंखे, प्रिंटर आदींसह विजेच्या उपकरणावर
परिणाम जाणवून बिघाड होऊ लागले आहेत. याचा भूर्दंड लोकांना सोसावा लागत आहे. रात्री बेरात्री वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण देखील वाढले आहेत. गावातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊन लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बरेचसे व्यवसाय आणि उद्योग विजेवर अवलंबून आहेत. मात्र वीजपुरवठा साथ देत नसल्याने आधीच मोडकळीस आलेले व्यावसायिक आणखी अडचणीत भरडले जात आहेत.

आणखी वाचा : नागपूरचे मिहान देखिल होतेय अनलॉक, हे उद्योग झाले सुरू

"फॉल्ट' शोधण्यात वेळ जातो !
आपल्या येथील वीजपुरवठा शेत शिवारातून पन्नास किलोमीटर अंतरापर्यंत पसरला आहे. वादळवारा आणि पावसामुळे बिघाड होत असून "फाल्ट' शोधण्यात वेळ लागतो.
सुहास चवळे, अभियंता वीज वितरण कंपनी
अरोली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power outage in the field