प्रकाश आंबेडकर म्हणतात, अरविंद बनसोड प्रकरणाची सीबीआय चौकशी करा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

उच्चशिक्षित अरविंद बनसोड यांचा 27 मे रोजी नागपूरमध्ये खून करण्यात आला. या प्रकरणात आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता.

नागपूर : अरविंद बनसोड मृत्यूप्रकरणी राज्य मंत्रिमंडळातील दोन सदस्य दबाव टाकत असून, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज (ता. 18) केली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बनसोड कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शिवाय आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी वकिलांशीही भेटून चर्चा केली. 

उच्चशिक्षित अरविंद बनसोड यांचा 27 मे रोजी नागपूरमध्ये खून करण्यात आला. या प्रकरणात आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. तसेच पोलिसांची भूमिकाही संशयास्पद होती. राज्यभर गाजलेल्या या हत्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आवाज उठविला. 

अधिक माहितीसाठी - नागपूरच्या या 'लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिकाऱ्यांची "शिकार"
 

राज्यभर निषेध करण्यात आले. सरकारला इशारा देण्यात आल्यानंतर या प्रकरणात कारवाई करीत अटकसत्र सुरू करण्यात आले. आज आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, यावेळी अरविंद बनसोडचे कुटुंब या ठिकाणी उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाच्या आवारातच अरविंदच्या कुटुंबीयांची आणि वकिलांची भेट घेऊन चर्चा केली. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी काय प्रयत्न करता येतील, ते केले जातील असे आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिले. 

राज्यात मागासवर्गीयांवर हल्ले वाढत असून त्याच्या विरोधात बुधवरी राज्यभर वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हा, तालुका स्तरावर निवेदन देऊन या सरकारचा निषेध करण्यात आला. हे हल्ले थांबले नाही तसेच सर्व प्रकरणात योग्य ती कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला, अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Ambedkar visited the family of Arvind Bansod