esakal | Video : तोट्याचा व्यवसाय समजली जाणारी शेती अशी ठरू शकते फायदेशीर; आष्टनकरांचा प्रयोग लाखमोलाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Pramod Aashtankar modern experiments in agriculture is worth lakhs Farmers news

शेतीची आवड, दररोज मेहनत आणि पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवनवीन पिके घेतली तर शेती फायदेशीर ठरू शकते, हे प्रमोद यांनी दाखवून दिले आहे. आज परिसरातील अनेक शेतकरी प्रमोद यांची शेती पाहण्यासाठी शेतात भेट देत आहेत.

Video : तोट्याचा व्यवसाय समजली जाणारी शेती अशी ठरू शकते फायदेशीर; आष्टनकरांचा प्रयोग लाखमोलाचा

sakal_logo
By
रवींद्र कुंभारे

गुमगाव (जि. नागपूर) : पारंपरिक पिकांना दरवेळी चांगला बाजारभाव मिळेलच असे नाही. त्यामुळे बळीराजाकडून शेतीत वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या पिकांमध्ये मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचा प्रयोग करून आर्थिक उन्नती साधण्याचा यशस्वी प्रयत्न ४१ वर्षीय प्रमोद वासुदेव आष्टनकर या युवा शेतकऱ्याने केला. त्यांचा हा शेतीतील आधुनिक ‘टच’ परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील प्रमोद आष्टनकर आपल्या शेतीत विविध प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा शेतामध्ये प्रयोग करून टरबूज, काकडी, वांगी, टमाटर, चवळा, तूर सारख्या पिकांचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया त्यांनी साधली आहे.

सविस्तर वाचा - पोलिसांना झाले काय? वाहतूक पोलिस शाखेत एटीपीच्या नावाखाली वसुलीबाज युवक

वातावरणाचा योग्य अभ्यास करून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खते देत जमिनीचा पोत सुधारला आहे. सोबतच शेतामध्ये आंतरपीक घेऊन उत्पादन क्षमता वाढवून शेतीचे ‘रुपडे’च बदलविले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, मार्केटचा अभ्यास यांची सांगड घालून तयार केलेली पीकपद्धती त्यांनालाखमोलाची ठरत आहे.

टरबुजाचे उत्पन्न घेणारे आणि पीकपद्धतीत मल्चिंगचा वापर करणारे प्रमोद आष्टनकर गुमगाव परिसरातील पहिले शेतकरी आहेत. त्यांच्या शेतातील टरबूजाला आता शहरातील मॉलमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी येण्यास सुरुवात झालेली आहे. मल्चिंग पेपरचा पिकामध्ये प्रयोग केल्यास खर्च कमी आणि उत्पादनात हमखास दीड पटीने वाढ होत असल्याचे आष्टनकर सांगतात.

शेतीची आवड, दररोज मेहनत आणि पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवनवीन पिके घेतली तर शेती फायदेशीर ठरू शकते, हे प्रमोद यांनी दाखवून दिले आहे. आज परिसरातील अनेक शेतकरी प्रमोद यांची शेती पाहण्यासाठी शेतात भेट देत आहेत. त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेतला तर तोट्याचा व्यवसाय समजली जाणारी शेती फायदेशीर ठरू शकेल, यात शंका नाही.

जाणून घ्या - मेहूणीशी असभ्य वर्तन जावयाला भोवले; विनयभंग व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा

खर्च कमी, उत्पन्न जास्त

मल्चिंगवरचे पीक घेतल्याने त्यांना ड्रीपद्वारे विद्राव्य खते आणि पाणी देता येते. मातीतील तापमान नियंत्रित राहून बाष्पीभवन कमी होते. पाण्याची बचत होऊन पिकांची योग्य वाढ होते. मल्चिंग पेपर तणांची वाढ देखील कमी करत असल्याने मजुरीचा खर्च कमी होतो. मातीतील पोषण द्रव्यात वाढ होते.

go to top