ऊर्जा खात्याच्या भरती घोटाळा : चंद्रशेखर बावनकुळे व प्रवीण कुंटे आमने सामने

टीम ई सकाळ
Friday, 27 November 2020

लवकरच गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही कुंटे पाटील यांनी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याला बावनकुळेंनी ‘खुशाल चौकशी करा’ असे प्रत्युत्तर दिले होते.

नागपूर : भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात ऊर्जा खात्यामध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी केला आहे. तेव्हाचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यावेळची भूमिका संशयास्पद राहिलेली आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी कुंटे पाटील यांनी केली आहे.

सन २०१७ मध्ये भरती प्रक्रिया झाली होती. त्यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. त्यांच्या इच्छेने भरती प्रक्रियेत घोटाळा झालेला आहे. मुख्य अभियंत्यांची तीन पदे भरण्यात येणार होती. यासाठी स्थापन केलेल्या निवड समितीमध्ये माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विपिन श्रीमाळी, कार्यकारी संचालक चंद्रकांत थोटवे, श्‍याम वर्धने, के. एम. चिरुटकर, ए. आर. नंदनवार, विनोद बोंदरे, व्ही. एम. जयदेव. जे. के. श्रीनिवासन हे दिग्गज अधिकारी होते.

अधिक वाचा - आता धावत्या मेट्रोत साजरा करा समारंभ; अवघ्या तीन हजार रुपयांत होणार ‘ग्रॅन्ड सेलिब्रेशन

या अधिकाऱ्यांनी टक्केवारी आणि गुणांचा हिशेब चुकीचा केला होता. या सर्व प्रकाराची सीआयडी चौकशी करण्याची मागणी कुंटे पाटील यांनी केली आहे. लवकरच गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही कुंटे पाटील यांनी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याला बावनकुळेंनी ‘खुशाल चौकशी करा’ असे प्रत्युत्तर दिले होते.

चौकशीचे आदेश देणार का?

या भरती प्रक्रियेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. आता गृहमंत्री अनिल देशमुख या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देतात का? आणि चौकशीत काय निष्पन्न होते, हे बघणे औत्सुक्याचे राहणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Praveen kunte says Home Minister should investigate corruption in energy department recruitment