नागपुरात तीन गर्भवती महिलांना कोरोनाने ग्रासले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

मंगळवारी (ता.12) चार गर्भवती मातांसह आणखी 6 संशयितांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याने उपराजधानीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 304 वर पोहोचला. सतरंजीपुरा येथील 42 वर्षीय तर मोमिनपुरा येथील 52 वर्षीय व्यक्तींचे अहवाल मेडिकल, मेयोतील प्रयोगशाळेतून कोरोनाबाधित आढळल्याचे आज स्पष्ट झाले.

नागपूर, :  थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव उपराजधानीत दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूची बाधा असलेला नवीन वस्तीतील नागरिक आढळून येत आहे. त्यातच सतरंजीपुरा आणि मोमिनपुरा हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरल्याने येथील रहिवासी अजूनही कोरोनाबाधित आढळून येत आहे. मंगळवारी (ता.12) चार गर्भवती मातांसह आणखी 6 संशयितांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याने उपराजधानीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 304 वर पोहोचला.

सतरंजीपुरा येथील 42 वर्षीय तर मोमिनपुरा येथील 52 वर्षीय व्यक्तींचे अहवाल मेडिकल, मेयोतील प्रयोगशाळेतून कोरोनाबाधित आढळल्याचे आज स्पष्ट झाले.
शहरातील पन्नासपेक्षा अधिक वस्त्यांमध्ये सद्यस्थितीत संचारबंदी लागू केली. पोलिस तैनात केले आहेत. येथील नागरिकांना विलगीकरणात पोहोचविण्यात आले आहे. त्यात मंगळवारी (ता.12) आणखी 6 जणांची भर पडली. विशेष असे की, मोमिनपुरा परिसरात स्वतःच्या घरीच विलगीकरणात होत्या. एकाच वेळी चार गर्भवतींना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

हे वाचा- आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या हो! विलगीकरणातील नागरिकांचा टाहो!!
नमुने तपासणीचा उच्चांक
शहरात 5 मार्चपासून कोरोना संशयितांचे नमुने तपासणीचे काम मेयो रुग्णालयात सुरू झाले. यानंतर मेडिकल, एम्स, माफसू आणि नीरी या ठिकाणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, आतापर्यंत या सर्व प्रयोगशाळेतून एकाच दिवशी पाचशेपेक्षा अधिक चाचण्यांची तपासणी करण्यात आली नाही. मात्र, मंगळवारी प्रकाशित केलेल्या महापालिकेच्या पत्रकातून तब्बल 568 नमुने तपासण्यात आल्याची माहिती पुढे आली. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. तर शहरात 5 हजार 785 नमुने तपासण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pregent women tested corona positive in Nagpur