कोरोनाच्या दहशतीतही गुरुजी भटकत आहेत वणवण... काय आहे मजबुरी? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

पटसंख्येवर शिक्षकांची संख्या आणि शासनाचे अनुदान अवलंबून असते. परिणामी, शिक्षकांचा उन्हाळा हा शाळेसाठी मुले शोधण्यासाठी वणवण भटकण्यात जातो आहे. यावर्षी कोरोनाचे संकट आल्याने शाळा बंद आहेत. त्या नेमक्‍या कोणत्या महिन्यात सुरू होतील यावर शाशंकता आहे.

नागपूर : शाळा सुरू होण्यापूर्वी त्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश हवे असल्याने दरवर्षी बऱ्याच शाळांकडून शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांची शोधाशोध सुरू करण्यात येते. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद करण्यात आल्या असल्या, तरीही शाळा प्रशासनाकडून शिक्षकांना विद्यार्थी शोधण्याच्या कामाला जुंपण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, सीताबर्डी येथील एका मोठ्या अनुदानित शाळेकडून विद्यार्थी न मिळाल्यास शिक्षकांना मुख्याध्यापकांकडून काढून टाकण्यात येईल, अशी तंबी देण्यात आलेली आहे. 

इंग्रजीकडे पालकांचा ओढा वाढू लागल्याने राज्यात कॉन्व्हेंट संस्कृती उदयास आली. प्रत्येकाला आपल्या पाल्याला इंग्रजी आणि हायफाय शाळेत टाकायचे असल्याने राज्यात सीबीएसई शाळांमध्ये गर्दी वाढू लागली. त्यामुळे इंग्रजी तिथेच गुणवत्ता, असा समज झाल्याने अनुदानित शाळांकडे शुल्क कमी असूनही पालकांनी पाठ फिरविली. त्यातूनच शहरातील काही शाळा वगळता इतर शाळा ओस पडू लागल्या आहेत. यामुळे शिक्षकांवर एकीकडे अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे.

दुसरीकडे विद्यार्थी संख्या टिकविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. पर्यायाने पटसंख्येच्या लढाईत शाळा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झुंज देत आहेत. पटसंख्येवर शिक्षकांची संख्या आणि शासनाचे अनुदान अवलंबून असते. परिणामी, शिक्षकांचा उन्हाळा हा शाळेसाठी मुले शोधण्यासाठी वणवण भटकण्यात जातो आहे. यावर्षी कोरोनाचे संकट आल्याने शाळा बंद आहेत. त्या नेमक्‍या कोणत्या महिन्यात सुरू होतील यावर शाशंकता आहे.

मात्र, अशा परिस्थितीतही शाळा प्रशासनांकडून शिक्षकांचा छळ सुरूच आहे. शाळांची गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्यापेक्षा विद्यार्थ्यांची जमावाजमव करण्यावर संस्थाचालक भर देत आहेत. सीताबर्डी येथील एका शाळेने सर्व शिक्षकांना फोन करून विद्यार्थी शोधण्याची सक्त ताकीद दिली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये "इकडे आड तर तिकडे विहीर' असा प्रसंग निर्माण झालेला आहे. 

हेही वाचा : केव्हा मिळणार नागपूर विद्यापीठाला कुलगुरू? प्रक्रिया लांबण्याची ही आहेत कारणे... 

शिक्षण विभागाच्या पत्राकडे दुर्लक्ष 
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी महिन्याभरापूर्वीच पत्र काढून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या काळात विद्यार्थी शोधण्यासाठी कुठल्याही शिक्षकाने वस्त्या व गावांमध्ये फिरू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. या निर्देशाकडे दुर्लक्ष करून शाळेच्या मुख्याध्यापकाने अशा प्रकारचे फर्मान काढले असल्याने या मुख्याध्यापकावर कारवाई व्हावी, अशी मागणी आता शिक्षक संघटनेकडून करण्यात येत आहे. 

 

कोरोनाच्या संकटात शिक्षकांना अशा कामाला जुंपणे हा गंभीर प्रकार आहे. यामुळे त्यांनाही कोरोनाचा धोका होण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळे अशा शाळांवर कारवाई होणे आवश्‍यक आहे. 

-नागो गाणार, शिक्षक आमदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pressure on teachers to get students