स्वतःची लॅब असताना मेडिकलमध्ये खाजगी पॅथॉलॉजिस्ट करतात तरी काय,  गोरखधंदा सुरूच

केवल जीवनतारे
Thursday, 8 October 2020

कोरोना संसर्गापूर्वीही अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ट्रॉमा युनिटमध्ये एका एजन्टला अटक केली होती, परंतु सुरक्षारक्षकांनी पोलिसांत न देता सोडून दिले होते. या गोरखधंद्याची 'नाळ' येथील डॉक्‍टरांशी चांगलीच जुळली असल्याची माहिती पुढे आली आहे.

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) रक्तपेढी आहे. २४ तास रक्त तपासणीची सोय आहे. तरीदेखील डॉक्‍टरांच्या मध्यस्थीने वॉर्डात खासगी (प्रायव्हेट) कोविड वॉर्डात पॅथॉलॉजीमधील "तंत्रज्ञ' येऊन कोरोनाबाधित रुग्णाचे रक्त काढतात. तपासणीसाठी बाहेर घेऊन जातात. नंतर वॉर्डात रिपोर्ट आणून देतात. खासगी पॅथॉलॉजीचे तंत्रज्ञ एजंट म्हणून येथे तैनात केले आहे. असे विदारक चित्र मेडिकलच्या कोविड वॉर्डात बघायला मिळते.

कोरोना संसर्गापूर्वीही अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ट्रॉमा युनिटमध्ये एका एजन्टला अटक केली होती, परंतु सुरक्षारक्षकांनी पोलिसांत न देता सोडून दिले होते. या गोरखधंद्याची 'नाळ' येथील डॉक्‍टरांशी चांगलीच जुळली असल्याची माहिती पुढे आली आहे. मेडिकलच्या पॅथॉलॉजी विभागात कोट्यवधींची अद्ययावत अशी यंत्रसामग्री आहे. रात्री अपरात्री रक्ताच्या चाचण्यांची सोय आहे. मात्र येथील डॉक्‍टर नातेवाइकांना रक्त चाचण्यांसाठी थेट खासगी पॅथॉलॉजीचा रस्ता दाखवितात. नाहीतर खासगी पॅथॉलॉजीतील तंत्रज्ञांना थेट वॉर्डात बोलावतात. 

हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला
 

यावरून डॉक्‍टरांचे लागेबांधे खासगी पॅथॉलॉजीशी जुळले असल्याचे निदर्शनास आले आहे. मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक ५१ मध्ये वॉर्डात भरती असलेल्या एका बाधित रुग्णाला आयएल-६ , सीआरपी ही रक्ताची चाचणी सांगण्यात आली. नातेवाइकांनी मेडिकलमध्ये करायची का? अशी विचारणा केली, उपचारादरम्यान वेळेत रक्त तपासणीचा अहवाल यावा ही रुग्णाच्या नातेवाइकांची माफक अपेक्षा असते. 

मेडिकलच्या प्रयोगशाळेत ही चाचणी होत नाही, असे कारण सांगत रक्त नमुने घेण्यासाठी थेट खासगी पॅथॉलॉजीतील तंत्रज्ञाला बोलवण्यात येते. डॉक्टरांकडून नातेवाइकांना नंबर दिला जातो. रक्त काढल्यानंतर काही वेळात अहवालही आणून दिला जातो. यासंदर्भात मेडिकल प्रशासनाशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

सविस्तर वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप
 

परवानगी नसतानाही प्रवेश कसा?

मेडिकल परिसरातली खासगी पॅथॉलॉजीचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ याच आवारात असतात. नातेवाइकांना डॉक्टरांकडून मिळालेल्या फोननंबरवर फोन केला, की, तत्काळ हजर होतात. खासगी पॅथॉलॉजीच्या तंत्रज्ञांना मेडिकलच्या वॉर्डात प्रवेश नसतानाही थेट वॉर्डात पोचतात कसे? हा खरा प्रश्न आहे. यासंदर्भात समता सैनिक दलातर्फे मेडिकल प्रशासनाकडे तक्रार करण्यात येणार आहे. विशेष असे की, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना या तक्रारीचे निवेदन सादर करण्यात येईल, असे अनिकेत कुत्तरमारे म्हणाले.

संपादन  : अतुल मांगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private pathology technician in the Covid ward of the medical hospital