प्राध्यापकाने तयार केले निर्जंतुकीकरण उपकरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जून 2020

कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी कोणतीही पोर्टेबल उपकरणे उपलब्ध नाहीत. कोविड सारख्या जिवाणू आणि विषाणूजन्य संक्रमणाचा प्रसार मोडण्यासाठी अशी उपकरणे विकसीत करण्याची तातडीची गरज आहे.

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कार्यालय आणि घराचे निर्जंतुकीकरण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ. संजय ढोबळे यांनी दोन उपकरणांची निर्मिती केली आहे. रोजच्या वापरात येणाऱ्या वस्तूसह फळभाज्या आणि कपड्यांचे निर्जंतुकीकरण करणे शक्‍य होणार आहे. विशेष म्हणजे हे उपकरण त्यांनी पेटंटसाठी सादर केले आहे.

वाचा- झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!  
कोरोना विषाणू 24 तासांपासून काही दिवसांपर्यत पृष्ठभागावर टिकून राहण्याची नोंद आहे. कार्डबोर्डवरील एका दिवसासाठी प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टीलवर तीन दिवसांपर्यंत व्हायरस सापडला आहे. कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी कोणतीही पोर्टेबल उपकरणे उपलब्ध नाहीत. कोविड सारख्या जिवाणू आणि विषाणूजन्य संक्रमणाचा प्रसार मोडण्यासाठी अशी उपकरणे विकसीत करण्याची तातडीची गरज आहे. त्यासाठी डॉ.संजय ढोबळे यांनी संशोधनास सुरुवात केली.

त्यांनी "यूव्ही' तंत्रज्ञानाचा उपयोग केला. "युव्हीसी लाइट'मध्ये "जर्मिसाईड' करण्याचा गुणधर्म आहे. त्यामुळे निर्जंतुकिकरण करण्याकरीता "यूव्ही टेक्‍नॉलॉजी ही स्वच्छ आणि इकोफ्रेंडली पद्वत असून वेळ वाचविणारी आहे. त्यामुळे स्मार्टफोनसह इतर वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी डॉ. ढोबळे यांनी पुढाकार घेतला. हे उपकरण देशात प्रथमच तयार करण्यात आल्याचा दावा डॉ. ढोबळे यांनी केला आहे. याद्वारे घर, कार्यालय, प्रामुख्याने दवाखाने यांचे अत्यंत कमी खर्चात निर्जंतुकीकरण करता येणे शक्‍य होणार आहे.

रेडियेशनच्या वापराने इजा नाही
डॉ. ढोबळे यांनी तयार केलेल्या उपकरणाद्वारे 99.99 जंतू, फंजाय, बॅक्‍टेरिया, विषाणू मारता येणे शक्‍य आहे. शिवाय हे इकोफ्रेंडली असल्याने स्मार्ट फोन, ताजी फळे, भाजीपाला, खाद्य पदार्थ, किराणातील साहित्याला कुठलीही इजा पोहचत नाही. शिवाय रेडीएशन तत्वावर तयार केले असल्याने लॅम्प बंद केल्यानंतर हे युनिट कोणतेच डिसइन्फेक्‍टंट मागे सोडत नाही. कारण हे आहे. कोणतीच रेडीओऍक्‍टीव्हीटी नाही आणि कुठल्याही वस्तुला अथवा जागेला इजा पाहोचत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Professor Invented Sanitizer instrument