मास्तर हे वागणे बरे नव्हे...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जानेवारी 2020

प्राध्यापकांच्या विरोधात विद्यापीठाने कडक कारवाईचे धोरण अवलंबले आहे. यासाठी इंग्रजीच्या 88 तर वाणिज्यच्या 30 अशा 118 प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांचे मूल्यांकन वेळेत करण्यासाठी महाविद्यालयांतर्फे बोलाविण्यात येणाऱ्या प्राध्यापकांकडून मूल्यांकनाला दांडी मारण्यात येत आहे. अशा जवळपास 118 प्राध्यापकांना परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. इंग्रजी विषयाचे 88 प्राध्यापक तर वाणिज्य शाखेतील 30 प्राध्यापकांचा यात समावेश आहे.

सविस्तर वाचा - गर्भात बाळ अन्‌ एमपीएससीचा पेपर, वाचा ही कहाणी

विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा नुकत्याच पूर्ण झाल्या. तीन टप्प्यात एकूण 969 परीक्षा घेण्यात आला. यादरम्यान वाणिज्य अभ्यासक्रमातील बी.कॉम. प्रथम, तृतीय आणि अंतिम वर्षाच्या सत्रांमधील बऱ्याच उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी प्राध्यापकांनी दांडी मारल्याचे समोर आले. त्यामुळे बी.कॉम. अभ्यासक्रमाचे निकाल लांबणीवर पडले आहेत. यासह इंग्रजी विषयाच्या अनेक प्राध्यापकांनी यावेळी मूल्यांकनाच्या कामाकडे पाठ फिरविली आहे. विद्यापीठाच्या मूल्यांकनावर याचा मोठा परिणाम झालेला आहे. अनेक महाविद्यालयांचे प्राचार्य हे मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना परवानगी देत नसल्याचे कारणही यात समोर आले आहे. तर काही प्राध्यापक "नॅक'चे कारण सांगून मूल्यांकनाच्या कामाचा दांडी मारत असल्याचे कळते. मात्र, परीक्षांचे मूल्यांकन ही प्राध्यापकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे मूल्यांकनाच्या कामाला पाठ दाखविणाऱ्या प्राध्यापकांच्या विरोधात विद्यापीठाने कडक कारवाईचे धोरण अवलंबले आहे. यासाठी इंग्रजीच्या 88 तर वाणिज्यच्या 30 अशा 118 प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विद्यापीठाने अशाही परिस्थितीमध्ये 627 परीक्षांचे निकाल जाहीर केले आहे. मात्र, वाणिज्य आणि इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकांनी मूल्यांकनाला दांडी मारल्याने काही निकाल हे अजूनही लटकले आहेत. विद्यार्थ्यांना वेळेत निकाल देण्यासाठी प्राध्यापकांनी मूल्यांकनात सहकार्य करणे आवश्‍यक आहे. मात्र, वाणिज्य आणि इंग्रजी अभ्यासक्रमाच्या प्राध्यापकांमुळे निकालात दिरंगाई होत असल्याने त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: professors rejected the order of nagpur university