रेल्वेस्थानकांवर उभी असलेली ही शेकडो वाहने कोणाची?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जून 2020

नागपूर रेल्वेस्थानकावरील पश्‍चिमेकडील दोनपैकी एकच तिकीट केंद्र सुरू ठेवण्यात आले आहे. रेल्वेसुरक्षा दलाचे ठाणे आणि जनरल वेटींग हॉलच्या मधोमध असणारे तिकीट केंद्र बंद आहे. तिकीट काउंटर समोरील मोकळ्या जागेत चक्का दुचाकी वाहने रांगेत उभी ठेवल्याचे दिसून येते.

नागपूर : रेल्वेचे विश्‍वच तसे अद्‌भूत. अलोट गर्दी असूनही सारे आपल्याच दुनियेत मश्‍गूल असतात. आता मात्र लॉकडाउन असल्याने रेल्वेस्थानकावर प्रवाशांची वानवाच आहे. यामुळे पश्‍चिम प्रवेशद्वाराकडील एक तिकीट केंद्र बंदच ठेवण्यात आले आहे. एरवी प्रवाशांच्या रांगा असणाऱ्या या केंद्रात आता चक्क वाहनांची रांग दिसून येत आहे.

कोरोनाच्या संकटामुळे रेल्वेची नियोजित प्रवासी वाहतूक बंद आहे. मोजक्‍याच स्पेशल ट्रेन चालविल्या जात आहेत. यामुळे प्रवाशांची संख्या अगदी नगण्यच. त्यातही संसर्गाच्या भीतीने बहुसंख्य प्रवासी ऑनलाईन तिकीट खरेदी करतात. जनरल तिकीटांची भानगडच नाही. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावरील पश्‍चिमेकडील दोनपैकी एकच तिकीट केंद्र सुरू ठेवण्यात आले आहे.

रेल्वेसुरक्षा दलाचे ठाणे आणि जनरल वेटींग हॉलच्या मधोमध असणारे तिकीट केंद्र बंद आहे. तिकीट काउंटर समोरील मोकळ्या जागेत चक्क दुचाकी वाहने रांगेत उभी ठेवल्याचे दिसून येते. एरवी या जागेत एकतर प्रवाशांच्या रांगा असायच्या किंवा गाडीच्या प्रतीक्षेत बसून राहणारे प्रवासी झोपा काढताना दिसायचे.
कोरोना विषाणुने मात्र परिस्थितीच पालटली आहे. मोजके प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी वगळता चिटपाखरूही रेल्वे स्थानकावर येत नाही. या जागेचा उपयोग आता वाहन ठेवण्यासाठी होत आहे. प्रवासी मोजकेच, त्यातही ते वाहनाने येण्याची शक्‍यता धुसरच, अशा स्थितीत या ठिकाणी उभी वाहने रेल्वेकर्मचारी किंवा आरपीएफ जवानांचीच असणार यात शंका नाही. बोलणारे कोणीच नसल्याने कर्मचारी "प्रिविलेज' घेत असतील तर त्यांचे चुकले तरी काय?, असा प्रश्‍न स्टेशनवर येणाऱ्यांच्या डोक्‍यात आला नाही तर नवलच.

हेही वाचा : अरेच्चा...कोरोना ला घाबरून घोड्याने देखील लावले मास्क ! 
प्रवेशद्वारावरच लक्षवेधी शामियाना
रेल्वे प्रवाशांना आपली काळजी आपणच घ्यावी लागते. उन्हाच्या झळा, अंगावर पाऊस, थंडीत गारवा झेलावाच लागतो. यंदा मात्र, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रवेशद्वारावरच शामियाना उभारला आहे. तोही अगदी ताडपत्री टाकून वॉटरप्रुफ. गाडीच्या दीड तास अगोदर प्रवाशांना रेल्वेस्थानकावर यावे लागते. रांगेत लागून सर्व तपासण्यांना सामोरे गेल्यावरच त्यांना आत सोडले जाते. सध्या उन्हाचा तडाखा आहे. लवकरच पाऊसही कोसळणार आहे. अशा अवस्थेत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली असून या सुविधेसाठी प्रवाशांकडून प्रशासनाचे कौतूकही होत आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Queue of vehicles at ticket counter