नागपूरात पदोपदी अडथळ्यांची शर्यत

राजेश प्रायकर
मंगळवार, 14 जानेवारी 2020

गणेशोत्सव, दुर्गोत्सव नसला तरी लग्न, वाढदिवस, चौदावी, डोहाळजेवण, कथा आदी समारंभासाठी शहरातील प्रत्येक गल्लीबोळातील रस्त्यांवर मंडपांची बजबजपुरी दिसून येत आहे. शहराच्या सर्वच भागात सिमेंट रस्ता टप्पा एक, दोन व तीनची कामे सुरू आहे.

नागपूर : शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात येत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. यात आता रस्त्यांवरील मंडपांनी नागपूरकरांच्या मनस्तापात भर घातली आहे. सिमेंटीकरणाच्या कामामुळे नागरिकांना दुसऱ्या मार्गाने फेरा मारून जावे लागत असून त्या 444 मार्गावरही लग्न, वाढदिवस समारंभासाठी उभारलेल्या मंडपाने अडथळे निर्माण केले आहे. एवढेच नव्हे तर अपघाताची शक्‍यताही बळावली आहे. परंतु, महापालिकेलाही याबाबत तयार केलेल्या नियमावलीचा विसर पडला असून नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.

हे वाचाच - अबब तब्बल एक लाख १५ हजारांचा आकडा

गणेशोत्सव, दुर्गोत्सव नसला तरी लग्न, वाढदिवस, चौदावी, डोहाळजेवण, कथा आदी समारंभासाठी शहरातील प्रत्येक गल्लीबोळातील रस्त्यांवर मंडपांची बजबजपुरी दिसून येत आहे. शहराच्या सर्वच भागात सिमेंट रस्ता टप्पा एक, दोन व तीनची कामे सुरू आहे. त्यामुळे एका बाजूचा रस्ता सुरू असून एका बाजूला सिमेंटीकरण करण्यात येत आहे. परिणामी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूची वाहतूक सुरू असल्याने नागपूरकरांची कोंडी होत आहे. सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्याने नागरिकांनी पर्यायी 'शॉर्टकट' शोधताना दिसून येत आहे. परंतु, त्यांच्या शॉर्टकट मार्गातही मंडपांचे अडथळे आले. एखाद्याकडे कार्यक्रम असल्याने दोन ते तीन दिवस मंडप उभारण्यात येत असल्याचे एका बिछायत केंद्र संचालकाने नमूद केले. त्यामुळे गल्लीतील रहिवासी नागरिकांना दोन ते तीन दिवस वाहने काढताना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा सिमेंट रस्ते तयार होत असल्याने मुख्य रस्त्यांशी जोडण्यात आलेले लहान रस्त्यांचा उपयोग नागरिक करतात. परंतु, मंडपांमुळे त्यांची कोंडी झाली आहे. एकीकडे सिमेंट रस्त्यांचे बांधकाम, दुसरीकडे रस्त्यांवरील मंडपामुळे नागरिकांना कार्यालयात पोहोचतानाही विलंब होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बोलणे खावे लागत आहे. रस्त्यांवरील मंडपाची बजबजपुरीवर लगाम लावण्यासाठी महापालिकेने चार वर्षांपूर्वी मंडपांबाबत नियमावली सभागृहात मंजूर केली. परंतु, महापालिकेच्या नियमाचा नागरिकांनी पुरता बोजवारा उडविला आहे.

उच्च न्यायालयाची अवहेलना

रस्त्यांवरील मंडपामुळे वाहनधारक असो की मंडपातील नागरिक यांच्यावर अपघाताची टांगती तलवार राहत होती. या संदर्भात उच्च न्यायालयाने पाच वर्षांपूर्वी राज्यातील सर्व महापालिकांना नियमावली तयार करून काटेकोरपणे अंमलबजावणीचे निर्देश दिले होते. या निर्देशावरून महापालिका प्रशासनाने नवीन नियमावली तयार केली. या नव्या नियमावलीला महापालिका सभेने मंजुरी दिली. परंतु, अंमलबजावणीला फाटा देत महापालिका न्यायालयाच्या निर्देशाचीच अवहेलना करीत असल्याचे चित्र आहे.

अशी आहे महापालिकेची नियमावली

  • - मंडपासाठी खड्डे खोदता येणार नाही.
  • - परवानगी घेणे बंधनकारक. आवश्‍यक.
  • - काम झाल्यानंतर तीन तासांत मंडप न काढल्यास प्रतितास 100 रुपये दंड.
  • - 24 तासांत मंडप न काढल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Race to the hurdles in Nagpur