भाटिया समूहाच्या मालमत्तेवर टाच, कोट्यवधीच्या कर्जाची थकबाकी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील भाटिया ग्रुपच्या संपत्तीवर स्टेट बॅंकेने टाच आणली आहे. भाटिया कोल समूहाच्या इंदूर येथील 29 मालमत्तांवर जप्तीची नोटीस चिटकवण्यात आली आहे. आतापर्यंत कंपनीच्या 70 मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत.

नागपूर : सुमारे अठराशे कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याने स्टेट बॅंक ऑफ इंडियाने भाटिया ग्रुपची मालमत्ता जप्त केली आहे. नागपूरमध्ये वर्धमानगर येथेसुद्धा भाटिया ग्रुपचे कार्यालय आहे. महाराष्ट्रातील वीजनिर्मिती तसेच अनेक वीजनिर्मिती क्षेत्रांतील खासगी व्यावसायिकांशी या ग्रुपचा संबंध आहे. या समूहाच्या नागपुरातील मालमत्तेचाही शोध घेतला जात आहे.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील भाटिया ग्रुपच्या संपत्तीवर स्टेट बॅंकेने टाच आणली आहे. भाटिया कोल समूहाच्या इंदूर येथील 29 मालमत्तांवर जप्तीची नोटीस चिटकवण्यात आली आहे. आतापर्यंत कंपनीच्या 70 मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत. कोळसा घोटाळ्याच्या दरम्यान भाटिया ग्रुप चांगलाच चर्चेत आला होता. नॅशनल ऍल्युमिनियम कंपनी (नालको) महाव्यवस्थापकाला लाच म्हणून सोन्याच्या विटा दिल्याचे उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. यानंतर या समूहावर सीबीआय व प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. महाराष्ट्र व मध्य प्रदेशात निकृष्ट कोळशाचा पुरवठा केल्याने सीबीआयने 2014 ला समूहावर छापे घातले होते. प्राप्तिकर विभागाने 70 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर चोरी केल्याने कारवाई केली होती.

सविस्तर वाचा - दत्रात्रेयनगरात दुहेरी हत्याकांड, मामा भाचीची हत्या

या समूहावर एनटीपीसी, एनएसपीसीएलच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून षड्‌यंत्र रचल्याचाही आरोप आहे. दोन्ही कंपन्यांसाठी इंडिनेशियाचा निकृष्ट दर्जाचा कोळसा कंपनीने खरेदी केला होता. त्यामुळे 116 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. याचा पुरवठा सिंगापूर येथील भाटियांच्या कंपनीनेच केला होता. महाराष्ट्रातील वीज वितरण कंपनीलाही निकृष्ट दर्जाचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र, बड्या राजकीय नेत्यांशी लागेबांधे असल्याने तो उघडकीस येऊ शकला नसल्याचे बोलले जाते. या समूहाचा कारभार सिंगापूर, इंडोनेशिया, साउथ आफ्रिका या देशात पसरलेला आहे.
भाटिया समूहाचे नागपूर येथील वर्धमाननगर येथे कार्यालय आहे. समूहाची नागपूरमध्येही कोट्यवधींची संपत्ती आहे. त्याचा शोध घेतला जात असल्याचे कळते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raid on Bhatiya group all over India