‘रूफ नाईन’ रेस्ट्रॉरेंटवर छापा, हुक्का पार्लर उघडकीस

अनिल कांबळे
Wednesday, 28 October 2020

सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कॉफी हाउस चौकात ‘रूफ नाईन’ रेस्ट्रॉरेंट आहे. येथे गेल्या अनेक महिन्यांपासून हुक्का पार्लर सुरू होते. सीताबर्डी पोलिसांचा या हुक्का पार्लरला आशीर्वाद होता, अशी चर्चा आहे.

नागपूर  ः धरमपेठमधील कॉफी हाउस चौकात असलेल्या ‘रूफ नाईन’वर गुन्हे शाखा पोलिसांनी छापा घातला. पोलिसांनी येथील हुक्का पार्लर उघडकीस आणले असून १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून हुक्का बारमालक आणि मॅनेजर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कॉफी हाउस चौकात ‘रूफ नाईन’ रेस्ट्रॉरेंट आहे. येथे गेल्या अनेक महिन्यांपासून हुक्का पार्लर सुरू होते. सीताबर्डी पोलिसांचा या हुक्का पार्लरला आशीर्वाद होता, अशी चर्चा आहे. ही माहिती गुन्हे शाखेच्या एसएसबीच्या प्रमुख पीआय तृप्ती सोनवणे यांना मिळाली. 

त्यांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना माहिती न होऊ देता सोमवारी रात्री छापा कारवाई केली. या छाप्यापूर्वीच काही ग्राहक पळून गेले. पोलिसांनी हुक्का पॉट, सुगंधित तंबाखू, म्युझिक सिस्टीम, स्पीकर्स व अन्य १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. समीर शर्मा आणि लकी जयस्वाल यांच्याविरूद्ध सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

क्लिक करा - ह्रदयद्रावक घटना: 15 ते 20 कुत्र्यांनी नऊ वर्षांच्या मुलाचे तोडले लचके, मूलाचा मृत्यू
 

ही कारवाई अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने आणि एसीपी नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पीआय तृप्ती सोनवणे, पीएसआय अतुल इंगोले, स्मीता सोनवणे, लक्ष्मीछाया तांबूसकर, अनिल अंबाडे, संतोष मदनकर, चेतन गेडाम, संदीप चंगोले, भूषण झाडे, मनिष रामटेके, अजय पौनिकर, रिना जाऊरकर, सुजाता पाटील आणि कुमुदिनी मेश्राम यांनी केली.

पत्नी, मुलीला सबलीने मारहाण

वाडी ठाण्यांतर्गत डिफेंस परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने क्षुल्लक भांडणावरून आपल्या पत्नीला सबलीने मारले. मुलगी बचाव करण्यासाठी आली असता तिलाही सब्बल मारून जखमी केले. आरोपी जयप्रकाश सिंह (४५) आहे. तो अंबाझरी ऑर्डिनंस फॅक्ट्रीमध्ये काम करतो. जखमींमध्ये जयप्रकाशची पत्नी गुडिया आणि मुलगी मेघाचा समावेश आहे. जयप्रकाश दररोजच काही ना काही कारणावरून पत्नीशी भांडण करतो. २० ऑक्टोबरला रात्रीही त्याने पत्नीशी भांडण केले. वाद विकोपाला गेल्यामुळे त्याने पत्नीला मारण्यासाठी सब्बल उचलली. आईला मारहाण होताना पाहून मेघाने बीचबचाव केला. जयप्रकाशने मुलीच्या नाक आणि खांद्यावर सब्बलीने वार करून गंभीर जखमी केले. 
 
संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raid on Roof Nine restaurant hookah parlor exposed