ट्रेनमध्ये भुकेने व्याकुळ झाले होते चार महिन्याचे बाळ; जवळचे दूधही होते खराब; अखेर आरपीएफने दाखवली तत्परता  

योगेश बरवड 
Wednesday, 4 November 2020

लहान मुलं भुकेने व्याकुळ होतात. अशावेळी कोणाची मदत मिळाली तर संकट दूर झाल्यासारखे वाटते. अशाप्रकारचा अनुभव पंजवानी कुटुंबियांना आला.  

नागपूर ः  लांब पल्ल्याचा ट्रेनचा प्रवास म्हंटलं की खाण्यापिण्याची नेहमीच गैरसोय होते. त्यात सोबत लहान मुलं असतील तर अधिक काळजी घेऊन, त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष ठेऊन ट्रेनचा प्रवास करावा लागतो. मात्र काही कारणास्तव हे करता आलं नाही तर लहान मुलं भुकेने व्याकुळ होतात. अशावेळी कोणाची मदत मिळाली तर संकट दूर झाल्यासारखे वाटते. अशाप्रकारचा अनुभव पंजवानी कुटुंबियांना आला.  

धडधड जाणाऱ्या रेल्वेत भूकेने व्याकूळ चार महिन्यांचे बाळ सतत रडत होते. आई- बाबाही चिंतातूर होते. ही बाब आरपीएफ जवानांनी हेरली. आवश्यक उपाययोजना करीत गाडीतच दूध उपलब्ध करून दिले. दूध पिताच बाळाच्या चेहऱ्यावर हसू फुलले. त्याने दिलेली समाधानाची ढेकर कर्तव्य तत्पर आरपीएफ जवानांसाठी कौतुकाची पावती ठरली. हा संपूर्ण घटनाक्रम हावडा मुंबई मेलमध्ये घडला. 

सविस्तर वाचा - विवाहितेची कमाल! जिवंत पतीला मृत दाखवून लाटले शासकीय अनुदान अन् केले दुसरे लग्न

मध्य प्रदेशच्या बुऱ्हाणपूरचे रहिवासी पंजवानी व्यापारी आहेत. ते सहपरिवार कार्यक्रमासाठी बिलासपूरला नातेवाईकांकडे गेले होते. कार्यक्रम आटोपून ०२८१० हावडा-मुंबई मेलने परतीच्या प्रवासाला निघाले. ए-२ कोचमधून प्रवास करीत होते. गोंदिया सोडताच चार महिन्यांच्या बाळाचे रडणे सुरू झाले. काही केल्या तो शांत होत नव्हता. 

त्याला भूक लागली असून दुधाची गरज आईने ओळखली. पण, पंजवानी दाम्प्त्याकडे असलेले दूध खराब झाले होते. शिवाय पेंट्रीकारमध्येही दूध उपलब्ध नव्हते. याच गाडीत मोतीबाग ठाण्याचे आरपीएफ निरीक्षक गणेश गरकल यांच्या नेतृत्वातील पथक पुनम सांगवान, मेघा सिंह यांच्यासह चार जवान कर्तव्यावर होते. महिला कर्मचाऱ्यांनी पंजवानी दाम्पत्याची विचारपूस केली. बाळाला जवळ घेत खेळवले. पण, उपयोग होत नव्हता. 

जाणून घ्या - शेतकऱ्याला अखेर मिळाले पिकविम्याचे पैसे; रक्कम वाचून बसेल धक्का

आरपीएफ जवानांनी रेल्वे कंट्रोलला फोन करून माहिती दिली. तसेच पंजवानी कुटुंबीयांनी १८२ वर कॉल केला. ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर येताच दूध उपलब्ध करून देण्यात आले. आरपीएफचे मदत कार्य पाहून पंजवानी यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि आरपीएफ डीजी यांना ट्विट करून आभार मानले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway police force arranged milk for child in train