शेतकऱ्याला अखेर मिळाले पिकविम्याचे पैसे; रक्कम वाचून बसेल धक्का

सुधीर भारती
Saturday, 31 October 2020

विशेष म्हणजे या संदर्भात संबंधित विमा कंपनीच्या एजंटकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात अतुल पांडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात तक्रारी केल्या, मात्र काहीच उपयोग झाला नाही. जिल्हाधिकाऱ्यांना तसेच आमदारांनासुद्धा तक्रारी देण्यात आल्या. मात्र, अद्याप पीकविम्याची रक्कम खात्यात मात्र जमा झालेली नाही.

अमरावती : राज्यात सरकार कुठल्याही पक्षाचे आले असले तरी शेतकऱ्यांच्या परिस्थितीत मात्र तीळमात्रही बदल झालेला नाही. जळका जगताप येथील शेतकऱ्याच्या खात्यात पीकविम्याचे चक्क १५४ रुपये जमा करण्यात आले तर अन्य तिघांच्या खात्यात एक रुपयासुद्धा आलेला नाही. सरकारच्या या क्रूर थट्टेमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पिकविम्याच्या रकमेसाठी आता या शेतकऱ्यांना कृषी कार्यालयाच्या फेऱ्या घालाव्या लागत आहेत.

राज्यातील शेतकरी आधीच परतीच्या पावसामुळे हवालदिल झालेले आहे. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांदेखत उद्‌ध्वस्त झाले. दिवाळी अंधारात जाण्यासारखी परिस्थिती आहे. अशा स्थितीत पिकविमा हा एकमेव आधार शेतकऱ्यांना होता. चांदूररेल्वे तालुक्‍यातील जळका जगताप येथील शेतकरी अतुल भास्कर पांडे यांचे तीन एकर शेती असून त्यामध्ये गहू व हरभरा घेतला. मात्र, हे पीक हातून गेले. विमा कंपनीकडे अतुल पांडे यांच्यासह रामकृष्ण गाडेकर, बाबूराव साबळे, आशा ठाकरे आदींनी पिकविमा काढला.

हेही वाचा - प्रेमीयुगुलाची एकाच झाडाला गळफास लावून आत्महत्या

नियमानुसार प्रिमियम सुद्धा भरले. मात्र, अतुल पांडे यांच्या खात्यात चक्क १५४ रुपयांची रक्कम जमा करण्यात आली तर उर्वरित शेतकऱ्यांना एक पैसाही मिळाला नाही. पांडे यांच्या मते त्यांनी भरलेल्या प्रिमियमनुसार पीकविम्याचे १० ते १२ हजारांची रक्कम मिळणे गरजेचे होते. मात्र, सरकारने केवळ १५४ रुपये देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली.

विशेष म्हणजे या संदर्भात संबंधित विमा कंपनीच्या एजंटकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात अतुल पांडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात तक्रारी केल्या, मात्र काहीच उपयोग झाला नाही. जिल्हाधिकाऱ्यांना तसेच आमदारांनासुद्धा तक्रारी देण्यात आल्या. मात्र, अद्याप पीकविम्याची रक्कम खात्यात मात्र जमा झालेली नाही. अशा परिस्थितीत दिवाळी कशी साजरी करावी असा मोठा प्रश्‍न या शेतकऱ्यंसमोर उभा ठाकला आहे.

अधिक वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

आमच्याकडे लक्ष कोण देणार?
सरकारने ऐन दिवाळीच्या काळात पिकविम्याच्या नावावर शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. १५४ रुपये खात्यात जमा करून सरकार कुठला संदेश देऊ इच्छित आहे हे समजत नाही. अनेक शेतकऱ्यांची अशीच अवस्था आहे. आमच्याकडे लक्ष कोण देणार?
- अतुल पांडे,
शेतकरी, जळता जगताप

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One hundred and fifty four rupees of crop insurance credited to the farmer account