
रेल्वेसेवा २१ मार्चपासून पूर्णतः बंद राहिली. श्रमिक स्पेशल ट्रेन वगळता अन्य प्रवासी रेल्वे ३१ जुलैपर्यंत रद्दच राहिल्या. गाड्या रद्द करतानाच ऑनलाइन तिकिटांचा परतावा प्रवाशांना ऑनलाइन पद्धतीनेच मिळाला.
नागपूर ः कोरोना संक्रमणामुळे रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यांच्या तिकिटांचा परतावा देण्यासाठी पूर्वी ६ महिन्यांपर्यंतची मुभा दिली गेली होती. पण, वेगवेगळ्या कारणांनी अनेक प्रवाशांना तिकीट रद्द करवून परतावा घेणे शक्य होऊ शकले नाही. रेल्वेने ९ महिन्यांपर्यंत परतावा देण्याचा निर्णय घेत प्रवाशांना दिलासा दिला आहे.
रेल्वेसेवा २१ मार्चपासून पूर्णतः बंद राहिली. श्रमिक स्पेशल ट्रेन वगळता अन्य प्रवासी रेल्वे ३१ जुलैपर्यंत रद्दच राहिल्या. गाड्या रद्द करतानाच ऑनलाइन तिकिटांचा परतावा प्रवाशांना ऑनलाइन पद्धतीनेच मिळाला. पण, पीआरएस मधून प्रत्यक्ष तिकीट खरेदी करणाऱ्यांना टप्प्या टप्प्याने परतावा देण्याची घोषणा रेल्वेने केली होती. एकाच वेळी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता प्रवासाच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत तिकीट रद्द करून देण्याची व्यवस्था रेल्वेने केली. परंतु, कोरोनाकाळात अनेकजण स्वगृही परतले.
कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे संपले नसल्याने बरीच मंडळी स्वगृहीच तळ ठोकून आहेत. अशात रेल्वेचे तिकीट रद्द करणे शक्य झाले नाही. मुदत संपत असल्याने तिकीट रद्द करण्यासाठी रेल्वेच्या आरक्षण खिडक्यांवर गर्दी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता प्रवासाच्या तारखेपासून ९ महिन्याच्या आत तिकीट रद्द करण्याची मुभा प्रवाशांना दिली गेली आहे. यामुळे अनेक प्रवासांना दिलासा मिळाला आहे.
नाकारलेल्या तिकीटांचाही फेरविचार
जुलै महिन्यापूर्वी प्रवासाची तारीख असणाऱ्या प्रवाशांनी डिसेंबर महिन्यापूर्वीच परतावा घेणे आवश्यक होते. पण, अनेकांना ते शक्य झाले नाही. सहा महिन्यांच्या नियमावर बोट ठेवून बऱ्याच प्रवाशांना परतावा नाकारून परत पाठवून देण्यात आले. अशा प्रवाशांना परतावा देण्याबाबत रेल्वेकडून फेरविचार करण्यात येत आहे.
संपादन - अथर्व महांकाळ