#SundaySpecial, Video : राजे-रजवाडे गेले अन्‌ राजपूत ठाकूर समाजावर आली ही वेळ...

Rajput Thakur community wanders for stomach
Rajput Thakur community wanders for stomach

नागपूर : राजे रजवाड्यांच्या पदरी असताना तलवार, भाले तयार करणाऱ्यांचे वंशज आता मात्र चाकू, सुऱ्या आणि कुऱ्हाड तयार करून पोट भरतात. पोटासाठी बैलबंडीवर बिऱ्हाड मांडून हजारो किलोमीटरचा जगण्यासाठीचा त्यांचा प्रवास वर्षानुवर्षे सुरू आहे. तयार केलेली कुऱ्हाड, चाकू, सुरा विकला तरच पोटाची भूक भागते, नाहीतर पोटातील आग पेटते. खुल्या आकाशाखालच्या रस्त्यावर जगण्याची ही जिवंत भेसूर परिस्थिती नागपूरपासून सत्तर किलोमीटर अंतरावर राजपूत ठाकूर समाजाच्या तांड्यावर प्रत्यक्ष पाहायला मिळते. 

हे सारे मूळचे राजस्थानचे. येथील राजपूत ठाकूर समाजाचे. राजस्थान म्हटलं की, अकबराशी सामना करणारे वीर महाराणा प्रताप. त्यांच्या योद्धांनी पराक्रमाच्या जोरावर शत्रूला पराभूत केले. महाराणांच्या योद्धांसाठी तलवार, भाले तयार करण्याचे काम राजपूत ठाकूर समाज करीत असे. त्यांचे हे वंशज. आयुष्यात अकबर बादशहासमोर कधीही शरणागती यांनी पत्करली नाही. संघर्ष करीत राहिले, लढत राहिले. मात्र, आज राजपूत ठाकूर समाजातील लोकांवर पोटासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा - सतरा वर्षाच्या प्रियकराने प्रेयसीसाठी गाठले छत्तीसगढ, मध्यप्रदेश अन्‌ केले हे...

राजस्थानच्याच्या मेवाड, चित्तोड, कुंभलगड, रणकपूर भागांतील हा समाज महिनाभरापूर्वी येथे आला आहे. सोळाव्या शतकातील राजपूत शासकांपैकी महाराणा प्रताप एक शासक होते. मुघलसम्राट अकबराला सतत टक्‍कर त्यांनी दिली. त्यांच्या पदरी राजपूत ठाकूर ही एक युद्धकलेतील प्रवीण जमात होती. युद्धाचा अनुभव घेताना अनेक वर्षे मुघलांबरोबर महाराणा प्रताप यांच्यासोबत राजपूत ठाकूर समाज लढला. महाराणा प्रताप यांच्या दरबारी राजपूत ठाकूरांना त्यांच्या शौर्याचे बक्षीस मिळत असे, परंतु अलीकडे स्वातंत्र्यानंतर मात्र या समाजाच्या माथ्यावर उदरनिर्वाहासाठी भटकंती करणं हेच नशिबात लिहिलं आहे. 

राजस्थानातून मध्य प्रदेशात बेगमंगज, भोपाल, शिवपुरी, गुणा, पांढुर्णा, अशी शहरं पालथी घालत महाराष्ट्रात पाच हजारांपेक्षा अधिक लोकं आले आहेत. शहराच्या सभोवताल सीमावर्ती भागात मोकळ्या आकाशाखाली आयुष्य जगणाऱ्या या बेघर समाजाला रात्री झोपण्यासाठी निवारा नाही. पहाटे पाच वाजता यांचा दिवस सुरू होतो. दिवस असो की, रात्र...त्यांच्या साथीला मोकळे आकाश असते. पावसाळा सुरू होईपर्यंत जगण्याचा त्यांचा नित्यक्रम सहा महिने असतो. ही फरपट मृत्यूनंतरच थांबेल असे या तांड्यातील तरुण उधम सिंग म्हणाले. 

साऱ्यांचा संसार तीन विटांवरचा

एका तांड्यावर किमान पाचशे ते सहाशे लोकांचा संसार असतो. तीन विटांवर शिजलेलं अन्न पोटात घातलं की, कुऱ्हाड, सुरा तसेच इतर वस्तू बनवण्यासाठी "साचा' तयार करतात. एकदा कुऱ्हाडीसह इतर साहित्य तयार झालं की, दिवसभर वस्त्यांमध्ये, खेड्यात फिरस्तीवर असतात. मिळवलेले पैसे गाठीशी ठेवतात. रात्री अपरात्री फिरतात त्यावेळी यांच्यावर "गुन्हेगार' हा शिक्काही अनेक वेळा लावला जातो. प्रत्यक्षात लढाऊ वृत्तीच्या या लोकांना घर नाही, वीज नाही, शौच करण्यासाठीही जागा नाही. ते बैलांची खरेदी-विक्री करतात. कुऱ्हाडी, वासला तयार करतात.

देशात सुमारे 15 कोटी लोकसंख्या भटक्‍या विमुक्तांची आहे. सरकारने देशपातळीवर भटक्‍यांच्या प्रश्‍नांची उकल करावी. देशात कौशल्य विकास योजना सुरू झाली, परंतु या समाजापर्यंत सरकारची कौशल्य योजना पोहोचली नाही. महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या (बार्टी) धर्तीवर घटनादत्त अधिकार देणारी संस्था तयार व्हावी. या समाजाच्या विकासासाठी राष्ट्रीय भटके विमुक्त कल्याण बोर्ड आहे, (घुमंतू मंडळ) शासन योजनांची माहिती पोहोचवणारे समतादूत तयार करून यांच्यासाठी काम केल्यास या समाजातील मुलांच्या हाती वही, पेन येऊ शकतो, असे संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे, मुकुंद अडेवार म्हणाले. 

आम्हाला सरकारने घुमक्कड असे नाव ठेवलं 
वीर महाराणा प्रताप यांचे आम्ही वंशज आहोत. आमचे आयुष्य दु:खाने भरलेले आहे. आमच्या लेकरांसाठी शाळा तयार झाली नाही, घरकुल मिळाले नाही. आधार कार्ड आहे, तर कोणाकडे रेशन कार्ड नाही. जातीचा पुरावाच आमच्याजवळ नाही. मात्र, मतांसाठी राजकारणी आमचा फायदा घेतात. आम्हाला सरकारने घुमक्कड असे नाव ठेवलं. भटकंती करत कष्ट करणे हेच आमचं आयुष्य. लेकरांना शिक्षण मिळावं, ते सायेब बनावे हीच इच्छा आहे. 
- भगवान सिंग ऊर्फ उधम सिंग, 
राजपूत ठाकूर समाजातील तरुण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com