रस्त्यावरचे आयुष्य जगणाऱ्या रामूला प्रतीक्षा सांताक्‍लॉजची

केवल जीवनतारे  
Friday, 25 December 2020

मुले ही देवाघरची फुले आहेत असे म्हणतात, परंतु रामू पोटासाठी स्वतःला फटके मारून घेतो. दिवसभर पाठीवर फटके घेत त्याचा चेहरा कोमेजून जातो. त्यानंतर कुठे त्याच्या पोटाची भूक भागते. आईसोबत काळा डांबरी रस्ता तुडवत तो हात पसरत निघालेला असताना सांता त्यांना कधीच का भेटत नाही,

नागपूर  ः वर्ष संपायला आलं की, नाताळाची चाहूल लागते. "बाळ येशूचा जन्म झाला.... असं संबोधित करणाऱ्या "कॅरोल गाण्यांचे स्वर दरवर्षी २४ डिसेंबरच्या रात्री कानावर पडतात. जिंगल बेल... जिंगल बेल, जिंगल ऑल द वे’ हे आनंदाचे गीत गात रात्री कधीतरी सांताक्‍लॉज येतो. बालगोपालांना भेट देतो. परंतु पिढयानपिढ्यांपासून गात येणाऱ्या सांताक्‍लॉजची खरी गरज आहे, रस्त्यावरचं आयुष्य जगताना खपाटीला गेलेलं पोट असलेल्या मुलांना. 

मुले ही देवाघरची फुले आहेत असे म्हणतात, परंतु रामू पोटासाठी स्वतःला फटके मारून घेतो. दिवसभर पाठीवर फटके घेत त्याचा चेहरा कोमेजून जातो. त्यानंतर कुठे त्याच्या पोटाची भूक भागते. आईसोबत काळा डांबरी रस्ता तुडवत तो हात पसरत निघालेला असताना सांता त्यांना कधीच का भेटत नाही, हा खरा सवाल आहे. या चिमुकल्या मुलांच्या भुकेच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी कोणी सांताक्‍लॉज काय येत नाही. रामूसारख्या मुलांना प्रतीक्षा आहे, आनंद लुटण्याची संधी देणाऱ्या सांताक्‍लॉजची.

अधिक माहितीसाठी - राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावाने चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 
 

रामू मूळचा कर्नाटक राज्यातील बिदरचा. पाचवीत आहे, असे त्याची शांतूआई अभिमानाने सांगते. रामूचे आई-बाबा दोघे रस्त्यावरचं आयुष्य जगतात. हाताला काम मिळालं तर त्यांच्या घरातील चूल पेटते, नाही तर पोटातील आग. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर शाळा बंद पडली. पोटाची भूक भागवायची कशी हा विचार करताना परराज्यातून पायी फिरत-फिरत नागपूर गाठलं. 

येथे शीतला माता मंदिराच्या आडोशाला मोकळ्या आकाशाखाली संसार थाटला. थंडीने पेटलेल्या या थंड वातावरणाही मोकळ्या आकाशाला पांघरून हे कुटुंब जगत आहे. शांतू आईने लेकराले पोतराज केलं अन रस्त्यावर तो फटके मारून घेतो. बदल्यात पाच दहा रुपये मिळतात. सायंकाळची सांज भागते. वडील लकडगंज परिसरात मिळेल ते काम करतात. आज रामूचा वाढदिवस. मात्र पोटासाठी पोतराजाची वेशभूषा धारण करण्यास उशीर झाला. सांताक्लॉजकडून भेट तर नाही मिळाली, परंतु सकाळी सकाळी त्याला गालावर बाबाने थप्पड मारली, हीच त्याला मिळाली वाढदिवसाची भेट.

पैसा जमा करणार

शांतूआई म्हणाली, शाळा बंद आहेत. पण पाटीवर काहीतरी लिहितो. शाळा शिकलं लेकरू. भिकेतून मिळालेल्या पैशातून पोटासाठी खर्च झाल्यानंतर उरलेला पैसा जमा करणार. लेकराले शाळेत पाठवणार. दावत स्कूल असं नाव आहे रामूच्या शाळेचं. काही दिवसात निघून जाणारं. अशी अनेक कुटुंब कर्नाटकातून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात आली. रामू रस्त्यावरचं आयुष्य जगणाऱ्या मुलांचं प्रतिकात्मक रूप आहे. अशा हजारो मुलांच्या नशिबी दारिद्रय आहे.  मोठ्या चौकात हातात भले मोठे पेटारे घेऊन उभे असणारे सांताक्‍लॉजला दिसत नाही. पोटासाठी भर चौकात स्वतःला फटके मारून घेणारी ही चिमुकली मुले. ज्या दिवशी या मुलांच्या हाती फक्त पुस्तक अन कलम देणारे सांताक्लॉज येतील, तो दिवस या मुलांसाठी आनंददायी ठरेल. त्या दिवशी रात्री १२ वाजता फटाके वाजवून नाताळचे स्वागत करावसे वाटेल.
 
संपादन : अतुल मांगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramu lives a life on the streets, waiting for SantaClaus