'आधी माहिती मिळाली असती तर आत्महत्या थांबविता आली असती'

राजू तंतरपाळे
Thursday, 24 December 2020

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावाने चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्याच्या प्रेताला अग्नी देताना लहान भावाचाही मृत्यू झाला. त्यानंतर बच्चू कडू यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

अंजनगावसुर्जी (अमरावती) : आत्महत्येच्या पूर्वी याप्रकरणाची माहिती मिळाली असती तर ही आत्महत्या थांबविता आली असती. आपल्याला न्याय मिळेल, या आशेतून त्यांनी माझ्या नावाने चिट्ठी लिहिली आहे. परंतु, काही विरोधक त्याचेसुद्धा राजकारण करून टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार करीत आहेत. अशोक भुयार पाठोपाठ त्यांच्या भावाचे निधन ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. याप्रकरणात निश्‍चितच सर्व प्रकारची चौकशी होणार असून, समिती स्थापन करण्यात येईल. त्यांना निश्‍चितच न्याय मिळेल. त्यांच्या कुटुंबीयांची मी भेट घेणार असून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. 

हेही वाचा - बाजारात स्टूल टाकून रुग्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी वसंतदादा पाटलांनाच दिला होता धक्का​

संत्रा विकल्यावर व्यापाऱ्यांनी पैसे न देता फसवणूक केली व पोलिसात गेल्यावर त्यांनी दमदाटी करून मारहाण केल्याने धनेगाव येथील शेतकरी अशोक पांडुरंग भुयार (वय 55) यांनी मंगळवारी (ता.22) आत्महत्या केली. त्यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमातच प्रेताला अग्नी देत असताना त्यांचा लहान भाऊ संजय पांडुरंग भुयार (वय 54) यांचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. समाजमन सुन्न करणारी ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, अशोक भुयार यांच्या खिशात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे संत्रा व्यापारी व पोलिस प्रशासनाकडून अन्याय झाल्याची आपबिती लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. आता या घटनेत दोन जिवांचा अंत झाला आहे. अस्मानी, सुलतानी संकटाने शेतात कष्ट करून नापिकीची झळ बसल्याने शेतकऱ्याने आपले जीवन संपविले. अशा घटना वारंवार घडत असताना आता शेतातील माल व्यापाऱ्यांना विकल्याने व्यापाऱ्याने पैसे न देता फसवणूक केली. त्याबाबत पोलिसांत दाद मागण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनीसुद्धा हेळसांड केली. त्यामुळेच शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अशोक भुयार यांच्या आत्महत्येमुळे धक्का बसल्याने त्यांचे लहान बंधू संजय भुयार यांचासुद्धा मंगळवारी (ता. 22) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने धनेगाव येथे शोककळा पसरली आहे. 

हेही वाचा - अरेरे हे काय, मृत्यूनंतरही बिबट्यावर कुऱ्हाडीने हल्ला

मृत अशोक यांचे लहान बंधू संजय भुयार हे मंगळवारी दुपारपासूनच तणावात होते. व्यापारी व पोलिस कर्मचाऱ्यांमुळे आपल्या भावाला टोकाची भूमिका घेत आत्महत्या करावी लागली, ही बाब सतावत असल्याचे त्यांच्या वागणुकीतून जाणवत होते, असे कुटुंबातील सदस्यांकडून सांगण्यात येते. भावाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयातून ताब्यात घेत शोकाकूल वातावरणात धनेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. येथे प्रेताला अग्नी देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच संजय पांडुरंग भुयार यांना छातीत अचानक वेदना होऊ लागल्या. त्यामुळे उपस्थित लोकांनी त्यांना तातडीने अंजनगाव येथील एका खासगी रुग्णालयात आणले. परंतु, वाटेतच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. एकाच घरातील दोन कर्त्या पुरुषांवर एकापाठोपाठ काळाने झडप घातल्याने संपूर्ण धनेगाव सुन्न झाले असून भुयार कुटुंबीयांवरील या आघाताने धनेगावात शोककळा पसरली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bachhu kadu reaction on farmer suicide in anjangaon surji of amravati