'बेटा शिवसेना का पॉवर हैं.. अख्खा फॅमिली को उडा दूंगा' 

अनिल कांबळे
मंगळवार, 30 जून 2020

विक्रम लाभे (वय 42, रा. शिवाजीनगर, अंबाझरी) यांनी भरत नगरातील पुराणिक ले-आउटमध्ये घर विकत घेतले होते. गेल्या 2012 पासून ते हैदराबादमध्ये स्थायिक झाले. त्यांच्या बंद असलेले  घर शिवसेनेचा शहरप्रमुख मंगेश कडव आणि पक्षातील काही साथीदारांनी हडपण्याचा कट रचला.

नागपूर : सध्या शिवसेना पक्षातील काही नेते पोलिसांच्या रडारवर आले असून, आतापर्यंत मोठमोठ्या तीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खंडणी वसुलीत प्रथम क्रमांकावर असलेल्या शिवसेनेचा शहर प्रमुख मंगेश कडव पोलिसांच्या टार्गेटवर असून, त्याच्यावर नागपूर पोलिसांनी सलग दोन खंडणीचे गुन्हे दाखल केले आहेत. मंगेशला कोणत्याही क्षणी नागपूर पोलिस अटक करण्यासाठी सज्ज आहेत. शिवसेनेचा शहर प्रमुख मंगेश कडव याच्याविरुद्ध अंबाझरी आणि सक्‍करदरा पोलिस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर बजाजनगर पोलिस ठाण्यात लवकरच मंगेश कडवविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम लाभे (वय 42, रा. शिवाजीनगर, अंबाझरी) यांनी भरत नगरातील पुराणिक ले-आउटमध्ये घर विकत घेतले होते. गेल्या 2012 पासून ते हैदराबादमध्ये स्थायिक झाले. त्यांच्या बंद असलेले  घर शिवसेनेचा शहरप्रमुख मंगेश कडव आणि पक्षातील काही साथीदारांनी हडपण्याचा कट रचला. 2019 ते जून 2020 पर्यंत मंगेश कडव याने बंद घराचे कुलूप तोडून घरातील टीव्ही, फ्रिज, भांडी, सोन्याचे दागिने आणि रोख 45 हजार रुपये असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यानंतर घरावर अवैधरीत्या कब्जा केला.

ही बाब विक्रम लाभे यांना कळताच त्यांनी मंगेश कडव यांच्याशी संपर्क केला. त्याने लाभे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. घरावरील ताबा सोडण्यासाठी दीड कोटी रुपयांची खंडणी मागितली. मंगेश कडव यांची गुंडगिरी लक्षात येताच लाभे यांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात चोरी, खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत तक्रार दिली. अंबाझरी पोलिसांनी लगेच मंगेश कडववर खंडणीचा गुन्हा दाखल केला. या तपास गुन्हे शाखा युनिट क्र. 1 चे प्रमुख वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुस्ताक शेख करीत आहेत. 

अधिक माहितीसाठी - Video : फार्महाऊसवर सहा जणांनी पतीसमोर केला पत्नीवर बलात्कार
 

शिवसेनेचा शहरप्रमुख मंगेश कडव याने देवा शिर्के याला 20 लाखांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास "बेटा, शिवसेना का पॉवर हैं... अख्खा फॅमिली को उडा दूंगा' अशी धमकी शिर्के यांना दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे खंडणीसाठी एखाद्याच्या जीवावरही उठण्याची मंगेशची तयारी होती, अशी चर्चा आहे. 

देवा शिर्केलाही मागितली खंडणी 

दुसऱ्या एका प्रकरणात सक्करदरा पोलिसांनीही शिवसेना शहर प्रमुख मंगेश कडव (रा. प्लॉट नं. 5859, डोंगरे ले-आऊट, अभ्यंकरनगर, सक्करदरा) यांच्यावर फसवणूक, खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. फिर्यादी देवानंद बाबासाहेब शिर्के (48, रा. छोटा ताजबाग, रघुजीनगर) यांनी एक दुकान विकत घेण्याचा सौदा मंगेश कडव याच्याशी 18 लाखांत केला. रोख व काही रक्‍कम धनादेशाद्वारे दिली. उर्वरित 3 लाख 50 हजार रुपये रजिस्ट्रीदरम्यान देण्याचे ठरले. मात्र मंगेश कडव हा टाळाटाळ करु लागला. चौकशी केली असता सदर दुकान बॅंकेत गहाण ठेवून 50 लाख रुपयांची उचल करण्यात आल्याचे निदर्शनात आले. उलट आरोपीने पैसे परत न करता 20 लाख रुपये खंडणीची मागणी केली. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देवा शिर्के यांनी सक्करदरा पोलिस ठाणे गाठून गुन्हा खंडणीसह विविध गुन्हे दाखल केले. 
 

युवासेनेचा खंडणीबाज अध्यक्ष अजूनही फरार 

सावकाराला 15 लाखांची खंडणी मागून 5 लाख रुपयांची खंडणी वसुली करणारा शिवसेना पक्षातील युवासेनेचा खंडणीबाज अध्यक्ष विक्रम राठोड सध्या पोलिसांच्या भीतीपोटी फरार झाला आहे. तर त्याचा लहान भाऊ शिवसेनेचा शहर कार्याध्यक्ष संजोग राठोड याला अजनी पोलिसांनी चार दिवसांपूर्वीच बेड्या ठोकल्या. शिवसेनेचा संजोग राठोड सध्या अजनी पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये बंद आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ransom case against ShivSena City chief Mangesh Kadav