दुर्मीळ पाणमांजर पाहिलाय का कुणी?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

विदर्भातील तापी, वैनगंगा, इंद्रावती अशा काही मोठ्या नद्यांमध्ये पाणमांजरीचे (ऑटर) अस्तित्व होते. मात्र, नद्या कोरड्या पडल्याने आणि जल प्रदूषणामुळे हा जलचर प्राणी अतिशय दुर्मीळ झाला. विदर्भात कुठेच या प्राण्याची नोंद नाही. लाजाळू असलेल्या या प्राण्याचे छायाचित्रसुद्धा अलीकडे न मिळाल्याने त्यास दुर्मीळ समजले जाते.

नागपूर : पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे अनेक प्राणी नामशेष होत आहेत. भरपूर पाण्यात आढळणारे पाणमांजर हे त्यापैकीच एक. विदर्भात अपुऱ्या पावसामुळे नद्या कोरड्या होत असल्यामुळे पाणमांजराचे अस्तित्वही नाहीसे होते आहे. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील नदीच्या पात्रात स्मूथ कोटेड ऑटर (पाणमांजर) प्राण्याची नुकतीच नोंद झाली. या प्राण्याचे छायाचित्रही प्रथमच मिळाले. अमरावती येथील वाइल्डलाइफ अँड एन्व्हायरमेंट कन्झर्व्हेशन सोसायटीचे (वेक्‍स)सदस्य आणि वन्यजीव छायाचित्रकार लतीश डेकाटे आणि वन्यजीव अभ्यासक अंकित बाकडे यांनी नदी पात्रात हा प्राणी आढळला.
विदर्भातील तापी, वैनगंगा, इंद्रावती अशा काही मोठ्या नद्यांमध्ये पाणमांजरीचे (ऑटर) अस्तित्व होते. मात्र, नद्या कोरड्या पडल्याने आणि जल प्रदूषणामुळे हा जलचर प्राणी अतिशय दुर्मीळ झाला. विदर्भात कुठेच या प्राण्याची नोंद नाही. लाजाळू असलेल्या या प्राण्याचे छायाचित्रसुद्धा अलीकडे न मिळाल्याने त्यास दुर्मीळ समजले जाते. आपल्या देशात या पाणमांजरांच्या स्मूथ कोटेड ऑटर, आशियन स्मॉंल क्‍लॉं ऑटर आणि युरेशियन ऑटर या तीन प्रजाती आढळतात. यापैकी मध्य भारतात स्मूथ कोटेड ऑटर ही प्रजातीचा फक्त आढळते. युरेसियन ऑटर प्रजातीची अलीकडेच मध्य प्रदेशात डब्ल्यूसीटीचे शास्त्रज्ञ आदित्य जोशी यांनी नोंद केली होती.

सविस्तर वाचा - अपमान सहन न झाल्याने केले असे

ही छायाचित्रे डॉ. जयंत वडतकर आणि वाइल्डलाइफ कन्झर्व्हेशन ट्रस्टचे आदित्य जोशी यांना पाठविल्यानंतर त्यांनी ते स्मूथ कोटेड ऑटर असल्याचे निश्‍चित केले. भारतात दुर्मीळ असली तरी ही प्रजाती सर्वत्र आढळते. नाकावरचा इंग्रजी व्ही प्रमाणे रंगाच्या खुणेमुळे ही प्रजाती ओळखणे सहज सोपे असते. चंद्रपूर येथील ही नोंद महत्त्वपूर्ण असून या प्राण्याचे छायाचित्र मिळणे फारच दुर्मीळ असल्याचे मत डॉ. जयंत वडतकर यांनी व्यक्त केले. या प्राण्यांचे अस्तित्व टिकून ठेवायचे असल्यास त्यांचे अधिवास अबाधित राखणे आवश्‍यक असल्याचे आणि शिकार होऊ नये यावर लक्ष ठेवणे आवश्‍यक असल्याचे आदित्य जोशी म्हणाले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rare smooth coted auter undetected in Chandrapur district