वाचाच एकदा! उंदीर, मांजर, वानरंही काही कमी नाही; पावणेपाच हजार नागरिकांना घेतला चावा

राजेश प्रायकर
Monday, 23 November 2020

उत्तर नागपुरातील चांभार नाल्याशेजारील वस्तीत डुकराने चिमुकल्याला ठार केल्याचीही घटना घडली. शहराच्या मध्य भागात मुंगूस दुर्मिळच, परंतु शहर सीमेवरील नव्या वस्त्यांत मुंगसाचा मुक्त वावर आहे. मुंगूसांनी साडेतीन वर्षांत २१४ लोकांंना चावा घेतला. त्यामुळे आता मुंगसांपासून सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

नागपूर : चावा घेण्यात मोकाट श्वान सर्वात पुढे आहे. परंतु, घरात फिरणारे उंदीर, पाळीव मांजर आणि झाडावर उड्या मारत चिमुकल्यांना आकर्षित करणारे वानरही चावा घेण्यात मागे नाही. गेल्या साडेतीन वर्षांत उंदीर, मांजर, वानरं, डुकरं, मुंगूस, ससा, घोडा या प्राण्यांनी पावणेपाच हजार नागरिकांना चावा घेतला.

प्रत्येक माणसाचा सर्वच प्राण्यांसोबत नकळत संंबंध येतोच. यातील सर्वच चावा घेत नाही. चावा घेण्यात मोकाट श्वान आघाडीवर आहेत. गेल्या साडेतीन वर्षांत ७५ हजार ५८७ नागरिकांना श्वानांनी चावा घेतला. श्वानांच्या चाव्याबाबत आता कुतूहल राहिलं नाही. परंतु, उंदीर, मांजर, वानरं, डुकरं, मुंगूस, ससा, घोडा या प्राण्यांनी नागरिकांना चावा घेतल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना महापालिकेने दिलेल्या आकडेवारीतून पुढे आली.

अधिक वाचा - चला मुलांनो, सोमवारपासून शाळेत या! ऑनलाईन बैठकीत घेतला निर्णय

मोकाट श्वानांशिवाय विविध प्राण्यांनी चार हजार ७८० लोकांना चावा घेतला. सर्वाधिक चावा घेणाऱ्यांत श्वानानंतर मांजरीचा क्रमांक लागतो. २०१७-१८ ते सप्टेंबर २०२० पर्यंत अर्थात मागील साडेतीन वर्षांत घरीव पाळीव तसेच मोकाट मांजरीने तीन हजार १३ लोकांना चावा घेतला. त्यामुळे श्वानांच्या भुंकण्यानंतर मांजरीचे गुरगुरणेही आता महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मांजरच नव्हे तर उंदरानेही ५९८ लोकांना चावा घेतला. चिमुकल्यांचे आकर्षण असलेल्या माकडानेही ५८४ जणांना चावा घेतला. त्यामुळे परिसरात माकडं दिसल्यानंतर त्याचा नाद करणे महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील अनेक भागात नाल्याच्या शेजारी डुकरं फिरत असतात. या भागातील डुकरं नागरिकांनाही जुमानत नाही. या डुकरांंनीही २१८ नागरिकांना चावा घेतला आहे.

क्लिक करा - ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या

उत्तर नागपुरातील चांभार नाल्याशेजारील वस्तीत डुकराने चिमुकल्याला ठार केल्याचीही घटना घडली. शहराच्या मध्य भागात मुंगूस दुर्मिळच, परंतु शहर सीमेवरील नव्या वस्त्यांत मुंगसाचा मुक्त वावर आहे. मुंगूसांनी साडेतीन वर्षांत २१४ लोकांंना चावा घेतला. त्यामुळे आता मुंगसांपासून सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

विविध प्राण्यांकडून नागरिकांचा चावा

प्राणी चावा घेतलेले नागरिक
मांजर ३०१३
उंदीर ५९८
वानर ५८४
डुक्कर २१८
मुंगूस २१४
ससा ४४
घोडा २१
इतर (गाय, गाढव आदी) ८८

 

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rats and cats took the bite of five and a half thousand citizens