
नागपूर ः आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्सच्या लसीकरणाबाबत नोंदणी तत्काळ बंद करा, या केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अचानक आदेशाने आज लसीकरण केंद्रांवर चांगलाच गोंधळ उडाला. आतापर्यंत लसीकरण न करणारे आरोग्यसेवक व फ्रंटलाईन वर्कर्सला लसीकरण केंद्रांवर जाऊन लस न घेताच परतावे लागले. विशेष म्हणजे लसीकरण केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱीही केंद्रीय आरोग्य विभागाच्या या आदेशाबाबत अनभिज्ञ असल्याने त्यांनाही मनस्ताप सहन करावा लागला.
शहरात १६ जानेवारीपासून आरोग्यसेवकांचे तर २ फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू झाले. विशेष म्हणजे केंद्र सरकारने लसीकरणासाठी एक प्रणाली सुनिश्चित केली आहे. या प्रणालीनुसार लसीकरण केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवक व फ्रंटलाईन वर्कर्सच्या नावाची नोंदणी सरकारी पोर्टलवर करणे शक्य होते. परंतु केंद्रीय आरोग्य विभागाने काल, शनिवारी अचानक आरोग्यसेवक व फ्रंटलाईन वर्कर्सची नोंदणी तातडीने बंद करण्याचे आदेश काढले. आदेश काढण्यापूर्वीच आरोग्यसेवक व फ्रंटलाईन वर्कर्स यांची नोंदणी करता येणार नाही, अशी तजवीज संगणकीय प्रणालीत केली. त्यामुळे काल सायंकाळीही लसीकरणासाठी गेलेल्या आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्सला रित्या हाताने परतावे लागले.
विशेष म्हणजे या आदेशाची माहिती लसीकरण केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांंनाही मिळाली नसल्याने त्यांचाही नाव नोंदणीच्या वेळी गोंधळ उडाला. नेमके काय झाले कुणालाच कळले नाही. सर्वच लसीकरण केंद्रांवरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन आले. त्यामुळे काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही बाब कालच कळली. परंतु अनेकजण याबाबत आजही अनभिज्ञ होते. त्यामुळे आज सकाळीही त्यांना संगणकीय प्रणालीचा त्रास सहन करावा लागला.
आरोग्यसेवक व फ्रंटलाईन वर्कर्सच्या नावाची नोंदणी होत नसल्याने इतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील नागरिकांचीही गर्दी झाली. अखेर लसीकरण केंद्रांवरील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअपद्वारे हे आदेश पाठविण्यात आले. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. परंतु आरोग्यसेवक व फ्रंटलाईन वर्कर्सला निराश होऊन परतावे लागले. सर्वच लसीकरण केंद्रावर हा गोंधळ उडाल्याचे दिसून आले. त्यामुळे उगीचच ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील नागरिकांना उष्ण तापमानात ताटकळत बसावे लागले.
नाव नोंदणी झालेल्या आरोग्यसेवकांना मिळणार लस
महापालिकेने १४ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवक व फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून नोंदणी यापूर्वीच करून घेतली. परंतु यातील अनेकांनी अजूनही लस घेतली नाही. नोंदणी झाली असल्याने या सर्वांना लस घेता येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी नमुद केले. नाव नोंदणीची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण करणारे पोलिस व इतर विभागातील फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्यसेवकांंना लस घेता येईल. आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्स यांची आता नोंदणी होणार नाही, असे ते म्हणाले.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.