आरोग्यसेविकेवर अतिरिक्त वेतन घेतल्याचा ठपका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जून 2020

आदेश जारी करण्यापूर्वी नोटीस पाठवून बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही. ही वसुली कोणत्या आधारावर काढण्यात आली आणि अतिरिक्त वेतन कसे व का देण्यात आले या बाबी आदेशात स्पष्ट करण्यात आल्या नाहीत. 

नागपूर : आरोग्यसेविकेला गेल्या काही वर्षांपासून अतिरिक्त वेतन दिले जात असल्याचा ठपका ठेवत 6 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्याचा आदेश प्रशासनाने काढला. या आदेशाविरोधात आरोग्यसेविकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतली असून न्यायालयाने आदेशाला अंतरिम स्थगिती दिली. चित्रा गजानन देशपांडे (मालेगाव. जि. वाशीम) असे आरोग्य सेविकेचे नाव आहे. त्यांनी वादग्रस्त वसुलीविरुद्ध नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे. 

याचिकेनुसार, आरोग्यसेविकेची नियुक्ती 2 सप्टेंबर 1986 रोजीची असून त्या सध्या जऊळका (रेल्वे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. त्यांना 1 जुलै 2013 ते 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत अतिरिक्त वेतन देण्यात आले, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे, 13 मार्च 2020 रोजी वादग्रस्त आदेश जारी करून देशपांडे यांच्यावर 6 लाख 11 हजार 121 रुपयांची वसुली काढण्यात आली आहे. हा आदेश अवैध असल्याचा दावा याचिकाकर्तीने केला आहे. आदेश जारी करण्यापूर्वी नोटीस पाठवून बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही. ही वसुली कोणत्या आधारावर काढण्यात आली आणि अतिरिक्त वेतन कसे व का देण्यात आले या बाबी आदेशात स्पष्ट करण्यात आल्या नाहीत. 

हेही वाचा : वरुडच्या दोन युवकांचा शेकदरी धरणात बुडून मृत्यू 

तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांकडून अशा पद्धतीने वसुली करता येत नाही, असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. त्यांनी वादग्रस्त आदेश रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने राज्याच्या नगरविकास विभागाचे सचिव, वाशीम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशीम जिल्हा आरोग्य अधिकारी व जऊळका (रेल्वे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना नोटीस बजावून याचिकेवर 30 जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्तीतर्फे ऍड. नरेंद्र ठोंबरे यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reprimand for taking extra salary