"रिसोर्ट घेता का रिसोर्ट', का आली ही वेळ...

राजेश रामपूरकर
बुधवार, 8 जुलै 2020

वनमंत्री संजय राठोड यांनी जंगल भ्रमंती सुरू करण्याचे निर्देश वन विभागाला दिले. त्यानंतर एक जुलैपासून ताडोबा-अंधारी बफर, पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटन सुरू करण्यात आलेत. उमरेड-कऱ्हांडलानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी प्रवेशद्वारावरुन पर्यटन बंद करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली.  

नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आदेशानंतर बंद केलेले निसर्ग पर्यटन सुरू केले आहे. जिल्हाबंदी, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांनी निसर्ग पर्यटनाकडे पाठ फिरवलेली आहे. त्यामुळेच निसर्गाच्या सानिध्यात उभारलेले हॉटेल्स व रिसोर्ट अनेक व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोरोनाची लस निघाल्याशिवाय या पर्यटनाला "बुस्ट' मिळणे अवघड असल्याने काही होम स्टे आणि रिसोर्ट संचालकांनी जंगलातील "प्रॉपर्टी' विकायला काढल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 

 

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर 19 मार्चपासून राज्यातील निसर्ग पर्यटनावर बंदी घालण्यात आली. तेव्हापासून सलग 105 दिवस राज्यातील अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प कुलूपबंद होते. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांचा रोजगार हिरावला आहे. टूरिस्ट गाईड, जिप्सी चालक, हॉटेल्स, रिसोर्ट आणि होमसह इतरही स्थानिक उद्योगांना या बंदीचा फटका बसला. विदर्भातील ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्प व टिपेश्वर अभयारण्याजवळील या व्यावसायिकांनी आपल्या उपजीविकेचे कारण पुढे करून बफरमधील पर्यटनाला परवानगी देण्याची मागणी केली होती. 

सहा महिन्यात गमावले बारा वाघ, या जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू, वाचा स्पेशल रिपोर्ट 

वनमंत्री संजय राठोड यांनी जंगल भ्रमंती सुरू करण्याचे निर्देश वन विभागाला दिले. त्यानंतर एक जुलैपासून ताडोबा-अंधारी बफर, पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटन सुरू करण्यात आलेत. उमरेड-कऱ्हांडलानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी प्रवेशद्वारावरुन पर्यटन बंद करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली. रिसोर्ट व हॉटेल संचालकांनी पिपारिया येथील ग्राम पंचायतीने पत्र देऊन हॉटेल सुरू करु नयेत असे निर्देश दिलेले आहेत. राहण्याची सोय नसल्याने पर्यटकांनी या प्रकल्पाकडे पाठ फिरवलेली आहे. 

पक्षीप्रेमींना सुखद धक्‍का; भंडारा, गोंदियात या पक्ष्यांचे झाले आगमन 

ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 13 प्रवेशद्वारांवरून पर्यटन सुरू झालेले आहे. जिल्हा बंदी काढण्यात आलेली नसल्याने इतर जिल्ह्यातील पर्यटकांना पर्यटनाकरिता पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. पोलिसांकडून पर्यटनासाठी परवानगी मिळणे कठीण आहे. त्यामुळे ताडोबामधील पर्यटनाला अद्यापही हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. 

 

ताडोबातील 70 टक्के पर्यटक हे नागपूरसह विदर्भातील असतात. जिल्हाबंदीमुळे "त्या' पर्यटकांना निर्ग पर्यटनाला जाण्याची इच्छा असली तरी त्यावर निर्बंध आलेले आहे. जंगलातील रिसोर्ट व हॉटेलचा उन्हाळ्यातील महत्त्वाचा व्यवसाय यंदा हातून गेला. पुढेही कोरोना लसीचा शोध लागल्याशिवाय या व्यवसायाला बुस्ट मिळण्याची शक्‍यता धुसर आहे. परिणामी, हॉटेल व रिसोर्ट व्यावसायिकांना पुढील पाच महिने तरी पर्यटकांची वाट पहावी लागणार आहे. उन्हाळ्याच्या पर्यटनाच्या व्यवसायावर या रिसोर्ट व हॉटेल संचालकांकडे आर्थिक पाठबळ मिळत होते. यंदा उन्हाळ्याचा पूर्णच काळ टाळेबंदीत गेल्याने काही रिसोर्ट व होम स्टे संचालकांसमोर आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांनी आपली प्रॉपर्टी विकायला काढल्या आहेत. 

उन्हाळ्याचा मुख्य व्यवयास हातून गेला 
उन्हाळ्यातील पर्यटनाचा मुख्य व्यवसायच यंदा टाळेबंदीमुळे हातून गेला आहे. यात लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान झाले असले तरी पुढील पर्यटन व्यवसाय चांगला होईल या आशेवर रिसोर्टचा व्यवसाय सुरू ठेवणार आहे. हॉटेलमधील कामगारही कामावर असले तरी त्यांची संख्या कमी झालेली आहे. मात्र, ताडोबा, पेंचमधील काही रिसोर्ट व होम स्टे व्यावसायिकांनी आपली प्रॉपर्टी विकायला काढली आहे. 
स्वानंद सोनी, सृष्टी रिसोर्ट, पेंच प्रकल्प  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resort On Sale due to Lockdown