Restrictions on the use of oxygen by the Department of Health
Restrictions on the use of oxygen by the Department of Health

ऑक्सिजनच्या वापरावर लावले निर्बंध, गंभीर रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ

नागपूर  ः कोरोना विषाणूच्या दंशामुळे शेकडो लोक मरण पावताहेत. नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना उपचाराचा भाग म्हणून किती ऑक्सिजन द्यायचा ही रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा वेळेवर निर्णय घेते. मात्र, आरोग्य विभागाने नुकतेच एक अजब फतवा जारी केला आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल असलेल्या रुग्णाला १२ लिटर तर इतर वॉर्डात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाला केवळ ७ लिटर प्रतिमिनिट ऑक्सिजन देण्यात यावे, असे निर्बंध घालून दिले आहेत. ऑक्सिजनच्या वापरावर लादण्यात आलेले निर्बंध गंभीर रुग्णांसाठी जीवघेणे ठरु शकतात याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

राज्यात कोरोना बाधितांसह मृत्यूचा आकडा प्रचंड फुगला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या १२ लाखांपेक्षा अधिक आहे. तर ३३ हजारांजवळ मृत्यूचा आकडा पोहचला आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज वाढत आहे. यामुळे राज्यभरातील मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन प्लान्टची क्षमता वाढवली आहे. मर्यादेपेक्षा जास्त प्लान्ट तयार केल्याने ऑक्सिजनचा पुरवठा रात्री अपरात्री संथ होतो. तर दुसरीकडे आॅक्सिजनवर असलेल्या कोरोनाबाधितांना ऑक्सिजनच्या वापरावर अंकुश लावण्याचा नवा उपाय आणला आहे. यामुळे रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात बऱ्याच भागात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. तशा तक्रारी पुढे आल्या आहेत.  नागपूरच्या मेडिकलमध्येही ऑक्सिजन प्लान्ट बंद पडले होते. यावर उपाय न शोधता आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑक्सिजन वापराचे ऑडिट करून वॉर्डमध्ये दाखल झालेल्या रुग्णाला सात तर अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णाला १२ इतकाच ऑक्सिजन द्यावा, असे पत्र वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना पाठवले आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. यामुळे ऑक्सिजनचा वापर वाढला आहे. 

आरोग्य आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाने यावर तत्काळ लक्ष घालावे आणि उपाययोजना सुचवावी, अशी सूचना या पत्रातून दिली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने एका परिपत्रकाद्वारे रुग्णालयातील ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या राज्यात 600 मेट्रिक टन ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरला जात आहे. तसेच मागणी झपाट्याने वाढत आहे. काही खासगी रुग्णालयात आर्थिक कारणांमुळे रुग्णावर गरज नसताना ऑक्सिजनचा वापर आवश्यकतेपेक्षा अधिक होत असल्याने या गोष्टीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. यामळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची नोंद पत्रकात आहे. 

उपचाराच्या अधिकारावर अतिक्रमण

यासंदर्भात डॉक्टरांशी चर्चा केली असता, प्रत्येक रुग्णाची प्रकृती वेगळी असते. त्याच्या प्रकृतीनुसार आणि उपचाराला मिळणारी दाद तसेच रुग्ण खाटेवर असताना असणाऱ्या परिस्थितीनुसार डॉक्टरांकडून उपचारात बदल करतात. त्यात ऑक्सिजनच्या वापराचाही समावेश आहे. रुग्णांची परिस्थिती बघून डॉक्टर निर्णय घेतात. मात्र, शासनाच्या या पत्रकामुळे रुग्णाला मोजून ऑक्सिजन द्यावे लागेल. यामुळे रुग्णांच्या जीवाचे बरे-वाईट झाले तर जबाबदार कोणाला ठरवणार असा सवालही वैद्यक क्षेत्रात विचारला जात आहे. चुकीचा आणि घातक निर्णय असून, डॉक्टरांच्या उपचारांच्या तसेच रुग्णाच्या हक्कावर घाला आणणारा हा निर्णय आहे, अशीही चर्चा मेडिकल-मेयोत रंगली आहे.


तर जबाबदार कोण? 

जे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात, त्यांच्या प्रकृतीनुसार ऑक्सिजन देण्याचे प्रमाण दिवसागणिक बदलत असते. व्हेंटिलेटवर असलेल्या एखाद्या रुग्णाला १०० टक्के ऑक्सिजनची गरज पडते. मात्र, शासनाच्या या निर्णयाने १०० टक्केऐवजी १२ लिटर देण्याच्या निकषानुसार ६८ टक्केच ऑक्सिजन द्यावा लागणार आहे. १०० व्हेंटिलेटवरील रुग्णाला २० लिटरही ऑक्सिजनची गरज पडू शकते. यामुळे त्याची प्रकृती खालावली तर जबाबदार कोण? डॉक्टराचं रुग्णावर उपचार करण्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे अशी चर्चा मेडिकलमध्ये वैद्यक तज्ज्ञांमध्ये पसरली आहे.

संपादन : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com