...तरी रस्ते मोकळे करायला का तयार नाहीत नागरिक?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जून 2020

31 मेपर्यंत शहराच्या जवळपास सर्वच भागांमध्ये वस्त्यांमधील अंतर्गत रस्ते बंदच असल्याचे चित्र दिसून येत होते. 1 जूनपासून लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता आणत अनलॉक-1 घोषणा करण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी स्वयंप्रेरणेतून कठडे काठून रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केली. 

नागपूर : भारतातही अनलॉक-1ची घोषणा झाली. पण, नागपूरकरांच्या मनातील भीती कमी होताना दिसत नाही. अजूनही शहरातील अनेक वस्त्यांमधील अंतर्गत रस्ते कठडे लावून बंदच आहेत. त्यामुळे वाहनचालक, फेरीवाल्यांची गैरसोय होत आहे. 

मार्चपासून देश लॉकडाउन करण्यात आला. कोरोनाच्या वाढत्या दहशतीनंतर अनेक भाग प्रशासनाकडूनच सील करण्यात आले. धास्तावलेल्या नागरिकांनी त्याच धर्तीवर रस्त्यावर कठडे लावून वस्त्यांमध्ये शिरणारे मार्ग रोखून धरले. अगदी विक्रेतेसुद्धा आत येऊ शकणार नाहीत, अशी व्यवस्था सर्वत्र दिसून येत होती. 31 मेपर्यंत शहराच्या जवळपास सर्वच भागांमध्ये वस्त्यांमधील अंतर्गत रस्ते बंदच असल्याचे चित्र दिसून येत होते. 1 जूनपासून लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता आणत अनलॉक-1 घोषणा करण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी स्वयंप्रेरणेतून कठडे काठून रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केली. 

पण, कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने अजूनही बऱ्याच वस्त्यांमधील रस्ते बंदच आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व व्यवसाय, उद्योग पूर्ववत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. पण, बंद रस्त्यांमुळे त्याला पायबंद बसतो आहे. ईश्‍वरनगर, गुरुदेवनगर एनआयटी कॉम्प्लेक्‍समागील रस्ता, नंदनवन, सद्‌भावनानगर, हसनबाग भागात अजूनही रस्त्यांवरील कठडे कायम आहेत. गुरुदेवनगर वसाहतीभोवती असणारे गेट बंदच ठेवण्यात आले आहेत. मोजकेच रस्ते आत शिरण्यासाठी असून सुरक्षारक्षक तैनात आहेत. चौकशीशिवाय कुणीच आत जाऊ शकणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 

हेही वाचा : प्राध्यापक करतोय शेतमजुरी; का आली अशी हलाखीची वेळ, वाचा... 

पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष 
कोरोना रुग्ण आढळलेले परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आले आहेत. त्याशिवाय कुणीही कठडे लावून रस्ते अडवू नयेत, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस दलाकडून देण्यात आला आहे. परंतु, पोलिसांच्या इशाऱ्यावर कोरोनाची दहशत वरचढ असल्याचे बंद रस्त्यांवरून अधोरेखित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roads remain locked even after the announcement of unlock