रोबोट आला ! कोरोना रुग्णांबाबतीत ठरणार सहायक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

रोबोटमध्ये एक डिस्प्ले स्क्रीन, कॅमेरा आणि एक स्पीकरदेखील सुसज्ज आहे जो डॉक्‍टरांद्वारे रुग्णांशी व्हिडिओ संप्रेषणासाठी वापरला जाऊ शकतो.

नागपूर : कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्‍टरप्रमाणे विश्‍वेश्‍वरय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थान (व्हीएनआयटी) आपले बहुमूल्य योगदान देत आहे. गेल्या दोन महिन्यांत विविध संशोधनाच्या माध्यमातून रुग्णांना सुविधा देणाऱ्या उपकरणांची निर्मिती करण्याचा धडाका संस्थेच्या विविध विभागाने लावला आहे.

डॉक्‍टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी व्हीएनआयटीच्या "आयव्हीलॅब्स' या रोबोटिक्‍स' लॅबच्या माध्यमातून "स्वंयचलित ट्रॉली'चे "सहायक रोबोट'मध्ये रूपांतर करण्यात यश मिळविले आहे. विशेष म्हणजे नागपूरच्या एम्समध्ये त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. 

दोघे सोबत आले, मिळून दारू प्यायले, क्षुल्लक कारणावरून झाला वाद आणि...

वायरलेस नियंत्रित केले जाऊ शकणाऱ्या या रोबोटद्वारे कोरोना रुग्णांना अन्नाची पाकिटे व औषधे पोचविण्यासाठी आणि सुरक्षित अंतर राखण्यासाठी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून अशा रोबोटचा वापर केला जाऊ शकतो. रोबोटमध्ये एक डिस्प्ले स्क्रीन, कॅमेरा आणि एक स्पीकरदेखील सुसज्ज आहे जो डॉक्‍टरांद्वारे रुग्णांशी व्हिडिओ संप्रेषणासाठी वापरला जाऊ शकतो. कोरोना व्हायरस रुग्णांच्या सेवेसाठी सध्या एम्स नागपुरात या रोबोटची चाचणी घेण्यात येत आहे. 

एम्सच्या संचालकांनी प्रथम असा रोबोट विकसित करण्याच्या विचारातून व्हीएनआयटीचे संचालक प्रो. पडोळे यांच्याकडे संपर्क साधला. यांत्रिकी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. शीतल चिद्दरवार, जे औद्योगिक रोबोटिक्‍स क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत त्यांनी या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारली आणि पथक सहायक म्हणून काम केले.

सध्याचा नमुना तिसरा वर्षाचा आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी, हर्षद झाडे, मोहम्मद सद, उदेशेश टोपे, उन्मेष पाटील आणि आयव्हीलॅब्सच्या इतर सदस्यांच्या पाठिंब्याने तयार केला आहे. व्हीएनआयटीचे माजी विद्यार्थी, अजिंक्‍य कामत, रोहन ठक्कर, अंशुल पैगवार हेदेखील या प्रकल्पाला पाठिंबा देत, मार्गदर्शन केले.

यावेळी "सहायक' रोबो, संचालक प्रो. पी. एम. पडोळे यांच्या हस्ते एम्सच्या फिजियोलॉजी विभागाच्या प्रोफेसर डॉ. मृणाल फाटक यांना हस्तांतरित आला. याप्रसंगी एम्स नागपूरचे डॉ. सनीव चौधरी, डॉ. प्रथमेश कांबळे, व्हीएनआयटी नागपूरचे डॉ.अजय लिखिते, डॉ. शीतल चिद्दरवार हे उपस्थित होते. 

चार तास चालतो, पन्नास मीटरवरून होतो ऑपरेट 
वापरण्याची सोपी आणि रोबोटची कमी किंमत हे या "स्वयंचलित ट्रॉलीच्या' या डिझाइनचे मुख्य फायदे आहेत. सदर ट्रॉलीमध्ये मॉड्यूलर डिझाइन पद्धती वापरली जाते, ज्याद्वारे अशा स्वयंचलित ट्रॉली सहज उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करून तयार करता येतात. सहायक रोबोट औषधे आणि सॅनिटायझरसमवेत एकावेळी 15 फूड पॅकेट वाहून नेऊ शकतात.

एकदा पूर्णपणे चार्ज झाल्यावर, रोबोट सतत 4 तास काम करू शकतो आणि त्या दरम्यान हस्तक्षेप कमीतकमी करावा लागतो. 50 मीटरच्या अंतरावरून हे रोबोट रिमोट कंट्रोलर आणि टॅब्लेटद्वारा ऑपरेट केले जाऊ शकतात. सहायक रोबोटची पुढील आवृत्तीमध्ये रुग्णांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी आणि मजल्यावरील साफसफाई करण्यासाठी आवश्‍यक ती यंत्रणा आणि थर्मल कॅमेरा बसविण्यात येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robot will help to deal with corona affected patient