कुणी केला नागपूरच्या युवा बॅडमिंटनपटूवर अन्याय ! 

file photo
file photo


नागपूर : आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये चारवेळा अजिंक्यपद, वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व, तीनवेळा राष्ट्रीय ज्युनिअर व सबज्युनिअर स्पर्धांमध्ये उपविजेतेपदांसह अनेक अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करूनही नागपूरची युवा बॅडमिंटनपटू रितिका ठक्करला केंद्र शासनाच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेत (टॉप्स) स्थान देण्यात आले नाही. एका प्रतिभावान खेळाडूवर भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि भारतीय बॅडमिंटन संघटनेने (बाई) अन्याय केल्यामुळे पालकांसह बॅडमिंटन जगतातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेने लक्ष घालून खेळाडूला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या निमित्ताने जोर धरू लागली आहे. 


साईद्वारे मिशन ऑलिम्पिक अंतर्गत 2024 व 2028 मधील ऑलिम्पिकसाठी नुकतीच देशभरातील 258 खेळाडूंची निवड केली. यात 27 बॅडमिंटनपटूंचा समावेश आहे. या यादीत नागपूरची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड व रोहन गुरबानीचाही समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत गेल्या अनेक वर्षांपासून ज्युनिअर व सिनियर गटात चमकदार कामगिरी करणारी नागपूरचीच रितिका ठक्कर व तिची मुंबईची पार्टनर सिमरन सिंघी या 'चॅम्पियन' जोडीला स्थान देण्यात आले नाही. साई व बाईने घेतलेल्या या निर्णयाबद्दल अनेकांनी आश्चर्य व नाराजी व्यक्त केली आहे. याउलट सुमार कामगिरी असूनही, काही खेळाडूंचा यादीत समावेश करण्यात आला आहे. जाणकारांच्या मते, भूतकाळातील कामगिरीच्या आधारावर या दोघींनाही 'टॉप्स'मध्ये स्थान द्यायला हवे होते. 

रितिका व सिमरन गेल्या काही वर्षांपासून सातत्याने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करीत आहेत. त्यांनी आयव्हरी कोस्ट, इजिप्त व मॉरिशससह चार आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये अजिंक्यपद मिळविले. वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. तीनवेळा राष्ट्रीय ज्युनिअर व सबज्युनिअर स्पर्धांमध्ये उपविजेतेपद पटकावले. सैयद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उपांत्यपूर्वफेरीत स्थान मिळविले. उल्लेखनीय म्हणजे, सलग पाच वर्षांपासून त्या राज्य स्पर्धांमध्ये 'चॅम्पियन' आहेत. शिवाय इतरही अनेक अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये त्यांनी आपली छाप सोडली आहे. एवढी चांगली कामगिरी असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मुख्य म्हणजे, ज्यांना रितिका व सिमरनने पराभूत केले, त्यांना या यादीत स्थान देण्यात आले आहे. काही विशिष्ट बॅडमिंटन अकादमींच्या खेळाडूंनाच झुकते माप देण्यात आल्याचा आरोप केला जात असून, या प्रकरणाला बॉलिवूडप्रमाणे भाई भतिजावादाचेही (नेपोटिझम) स्वरूप देण्यात येत आहे. साई व बाईच्या निर्णयावर रितिकाच्या पालकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकरणी महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी यांचे लक्ष वेधून, मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. 'टॉप्स'साठी निवड झालेल्या खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षणासोबतच दर महिन्याला 25 हजार रुपयांची शिष्यवृत्तीही मिळणार आहे. 

' राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट प्रदर्शन करूनही रितिका व सिमरनला 'टॉप्स'मध्ये स्थान न मिळाल्याने आम्ही निराश झालो. हा आमच्या मुलीवर घोर अन्याय आहे. यासंदर्भात मी महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी यांना मेल करून न्याय मागितला आहे.' 
-राहुल ठक्कर, रितिकाचे वडील  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com