नागपूरच्या सलूजा दाम्पत्याने दिला ग्राहकांना अनोखा ऑनलाइन पर्याय

नरेंद्र चोरे
Thursday, 24 September 2020

सजावट आणि कॅटरिंग व्यवसायात अनेक वस्तू सहज मिळत नसल्याने व त्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागत असल्याने ग्राहकांना मोठी अडचण जात होती. ही बाब ‘डेकॉन्ट’च्या सहसंस्थापक कमल व लगन या सलूजा दाम्पत्याच्या लक्षात आली. या दोन्ही वस्तूंना एकत्र आणू शकणाऱ्या व्यासपीठाची त्यांना कमतरता जाणवली. याच उद्देशाने त्यांनी ‘डेकॉन्ट’ या ऑनलाइन स्टार्टअपची सुरुवात केली.

नागपूर : छोट्या शहरांमध्ये सजावट आणि कॅटरिंगच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळणे कठीण असते. अशा वेळी ग्राहकांना मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. ही अडचण लक्षात घेऊन नागपूरच्या एका दाम्पत्याने ग्राहकांसाठी ‘डेकॉन्ट’ नावाचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून ग्राहकांना चांगला पर्याय तर मिळालाच, शिवाय विक्रेते आणि ग्राहक यांच्यातील अंतरही कमी झाले. केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’ मोहिमेला हातभार लावणाऱ्या या प्लॅटफॉर्मला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

सजावट आणि कॅटरिंग व्यवसायात अनेक वस्तू सहज मिळत नसल्याने व त्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागत असल्याने ग्राहकांना मोठी अडचण जात होती. ही बाब ‘डेकॉन्ट’च्या सहसंस्थापक कमल व लगन या सलूजा दाम्पत्याच्या लक्षात आली. या दोन्ही वस्तूंना एकत्र आणू शकणाऱ्या व्यासपीठाची त्यांना कमतरता जाणवली. याच उद्देशाने त्यांनी ‘डेकॉन्ट’ या ऑनलाइन स्टार्टअपची सुरुवात केली. या माध्यमातून सोफा, काऊचेस, डेकोरेशन साहित्य, रेडीमेड क्लॉथ्स, कॅटरिंग व हॉटेलवेअर, लाईटिंग व इलेक्ट्रॉनिक्स, फॅन्सी आयटम्स, फ्लॉवर्स इत्यादी वस्तूंची आॅनलाइन विक्री करण्यात येते. ‘डेकॉन्ट’ची दहा सदस्यीय टीम देशभर ऑपरेशन्स, विक्री, विपणन आणि लॉजिस्टिकमध्ये काम करीत आहे. तंबू, सजावट तसेच कॅटरिंग मटेरियल विकण्यासाठी त्यांनी व्हिज्युअल स्टोअर तयार केला आहे. कंपनीचे ऑनलाइन ॲप आहे. त्याद्वारे ग्राहक पाच हजारांपेक्षा अधिक वस्तू ऑर्डरद्वारे निवडू शकतात. ग्राहकांसाठी ऑनलाइन पेमेंट व ऑक्टोबर २०१९ पासून कॅश ऑन डिलिव्हरीची सोय उपलब्ध करून देण्यात आली. ‘डेकॉन्ट’ विकल्या गेलेल्या प्रत्येक उत्पादनावर टक्केवारीवर आधारित कमिशनद्वारे पैसे कमावते. सदस्यता शुल्क घेते आणि वापरलेल्या उत्पादनांवर कमिशन घेते. ‘डेकॉन्ट’आपल्या विक्रेत्या व ग्राहकांना नेपाळमध्येही सेवा देत आहे. 

 

हेही वाचा : नागपूर जिल्ह्यात तयार होणार ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू

 

२०१८ मध्ये १० लाखांचा महसूल मिळविल्यानंतर गतवर्षी हा आकडा ३५ लाखांवर गेला. या वर्षी जानेवारीमध्ये त्यात आणखी वाढ होऊन ८७ लाखांची कमाई झाली. ग्राहकांना उत्पादने ऑनलाइन निवडण्याचा पर्याय देण्यात आम्ही यशस्वी ठरलो, याचे आम्हाला समाधान आहे. लगन म्हणतात की, देशभरात सध्या अनेक ऑनलाइन स्टोअर्स व मार्केटप्लेस उपलब्ध आहेत. मात्र, काही वेळा ग्राहकांना ऑनलाइन खरेदीची भीतीदेखील वाटते. अशा वेळी विश्वासाचे ठिकाण आवश्यक असते. अशा ग्राहकांसाठी ‘डेकॉन्ट’ हे हक्काचे व विश्वासाचे प्लॅटफॉर्म राहणार आहे. 

 

‘डेकॉन्ट’चे जाळे जगभर पसरविणार 

सलूजा दाम्पत्याने त्यांची कुणाशीही स्पर्धा नसल्याचे सांगून, नजीकच्या काळात आपल्या व्यवसाचे जाळे देशविदेशात पसरविण्याची इच्छा बोलून दाखविली. त्यासाठी त्यांना मोठे वितरण नेटवर्क उभे करायचे आहे. तंत्रज्ञानावर भर द्यायचा आहे. ‘डेकॉन्ट’ सुरू करण्यापूर्वी लगन सलूजा यांनी बंगळुरूमध्ये काही आयटी दिग्गजांसोबत काम केले होते. त्या अनुभवाचा त्यांना खूप फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले.  

 

संपादन : मेघराज मेश्राम

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saluja Couple from Nagpur Offered Customers a Unique Online Option