लॉकडाऊनच्या काळात समता सैनिक दलाने उचलली ही जबाबदारी...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

समता सैनिक दलाच्या ऍड. स्मिता कांबळे यांच्या नेतृत्वात रिंग रोडने हजारो मजूर प्रवास करीत आहेत. नागपूरचे सहपोलिस आयुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस विभागाने जिल्ह्यातून जाणाऱ्या मजुरांकरिता पांजरी व मनसर नाक्‍यावर व्यवस्था केली आहे.

नागपूर : लॉकडाऊनमुळे कामगार, मजुरांचे सर्वाधिक नुकसान झाले. दीड महिन्यापासून हाताला काम नसल्याने जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याने मजू शेकडो किलोमीटरचा प्रवास करीत घराकडे निघाले. या मजुरांच्या मदतीला समता सैनिक दलाचे सैनिक धावून आले. मजुरांना वर्धा मार्गावरील पांजरी नाक्‍यावर समता सैनिक दलाचे पथक मदत करीत आहे. त्यांना मार्गदर्शन करून घरवापसीचा मार्ग सुकर करीत आहेत. तसेच रेल्वे आणि बस स्थानकावरही सेवा देत आहेत.

 

रोजगाराकरिता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, कोलकाता आदी प्रदेशातून कोट्यवधी मजूर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक आदी राज्यांत गेले होते. लॉकडाऊननंतर रेल्वे, बससह कोणत्याही वाहनाची सुविधा नसल्याने हे मजूर पायीच शेकडो किमीचे अंतर पार करीत होते. आता या मजुरांना महाराष्ट्र सरकारने सीमा क्षेत्रापर्यंत एसटीने मोफत प्रवास सुरू केला आहे.

 

रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी केला जालीम उपाय, पण घडले हे अघटित...

समता सैनिक दलाच्या ऍड. स्मिता कांबळे यांच्या नेतृत्वात रिंग रोडने हजारो मजूर प्रवास करीत आहेत. नागपूरचे सहपोलिस आयुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस विभागाने जिल्ह्यातून जाणाऱ्या मजुरांकरिता पांजरी व मनसर नाक्‍यावर व्यवस्था केली आहे. त्यांच्या आवाहनानंतर पांजरी नाक्‍यावर सहायता केंद्र निर्माण करण्यात आले.

गरजू मजुरांना जेवण, रेशन आणि वैद्यकीय उपकरण वितरित करण्याकरिता समता सैनिक दलाला (मुख्यालय दीक्षाभूमी) आवाहन केले. भरणे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समता सैनिक दलाच्या सैनिकांची तुकडी पांजरी नाक्‍यावर तैनात करण्यात आली आहे.

गेल्या 20 दिवसांपासून समता सैनिक दलाची तुकडी पांजरी टोल नाक्‍यावर दिवसरात्र काम करीत आहे. मजुरांच्या खाण्याची-पिण्याची सोय, योग्य वैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षित बसेसमध्ये बसवून राज्याच्या सीमेपर्यंत रवाना करीत आहेत. तसेच रेल्वे स्थानकावरही सेवा देत आहे. कामगारांना जेवणासोबत आरोग्य तपासणी आणि रेल्वेबाबत मार्गदर्शन करीत आहे. एसटी स्थानकारवही एक तुकडी कार्यरत आहे.

समता सैनिक दलाच्या तुकडीचे नेतृत्व सैनिक विश्वास पाटील आणि राजेश लांजेवार करीत असून त्यांचा मार्गदर्शनात टारझन दहीवाले, प्रफुल्ल मेश्राम, अजय बागडे, प्रज्ज्वल बागडे, प्रतिक कांबळे, धीरज सहारे, नंदकिशोर खोबरागडे, सुखदास बागडे, गौतम पाटील आदी सेवा देत आहेत. राजीवनगर येथील सैनिक तुफान कांबळे, रितेश देशभ्रतार आदींचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samata Sainik Dal Help to workers in corona lockdown