रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी केला जालीम उपाय, पण घडले हे अघटित...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

रानडुकरांपासून उसाच्या संरक्षणासाठी झाडावर बसून अर्थिंग तार लांबविताना विजेच्या मुख्य तारेला स्पर्श झाला. यात दुलीचंद यादवराव गौपाले (वय 35) व मुकेश माधवराव गौपाले(वय 25) रा. लोभी (ता. तुमसर) या दोन्ही चुलत भावंडांचा जागीच मृत्यू झाला.

भंडारा : अल्पभूधारक शेतकऱ्याचे संयुक्त कुटुंब. शेतात मोठ्या मेहनतीने उसाची लागवड केली. परंतु, उसाच्या फडात रानडुकरे शिरून नासधूस करतात. उसाचा फडशा पाडतात. म्हणून त्यांचा बंदोबस्त लावण्यासाठी दोन्ही चुलत भाऊ गेले. परंतु, नियतीने त्यांनाच आपले सावज बनविले.

रानडुकरांपासून उसाच्या संरक्षणासाठी झाडावर बसून अर्थिंग तार लांबविताना विजेच्या मुख्य तारेला स्पर्श झाला. यात दुलीचंद यादवराव गौपाले (वय 35) व मुकेश माधवराव गौपाले(वय 25) रा. लोभी (ता. तुमसर) या दोन्ही चुलत भावंडांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी (ता. 24) सकाळी चांदमारा शेतशिवारात ही दुर्दैवी घटना घडली.

लोभी येथील यादवराव गंगारा गौपाले व त्यांच्या भावाची चांदमारा येथे एक-दीड एकर शेती आहे. शेती हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय असून, मुलगा दुलीचंद हासुद्धा शेतीत वडिलांना हातभार लावायचा. सध्या शेतात उसाचे पीक लावले आहे. परंतु, दररोज रानडुकरे येऊन उसाचे नुकसान करतात. त्यामुळे या भागातील शेतकरी त्रस्त आहेत.

नागपूरच्या तापमानासोबत वाढली नागपूरी खर्ऱ्याचीही उच्चांकी, पालापाचोळाही मिसळविला जातो तंबाखात...

चुलत भाऊ असलेले दुलीचंद व मुकेश दोघेही शेतावर गेले. शेताच्या सभोवताल तार लांबवीत होते. अचानक हातातील तारेचा वीज वाहून नेणाऱ्या जिवंत तारेला स्पर्श झाला. अन एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. एकाच कुटुंबातील दोन भावंडांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले आहे. या अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाला वनविभाग व प्रशासनाने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

 

दोष कोणाचा?

शेतकरी व त्याची शेती ही कायम असुरक्षित. कधी कोरड्या दुष्काळाचे भय तर कधी अवकाळाची भीती. सर्पदंशाने तर कधी वीज पडून शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा अकाली मृत्यू येण्याच्या घटना घडतात. शेती हा जीव की प्राण. घाम, गाळून कष्ट करून पिकविलेले उभे पिक डोळ्यादेखत नष्ट होताना पाहून सैरभैर झालेल्या, संतापलेल्या शेतकऱ्याला मग टोकाची भूमिका घ्यावी लागते. बरेच शेतकरी रानडुकरांना उसापासून दूर ठेवण्यासाठी तारांचे कुंपण करून वीजप्रवाह सोडतात. वनविभाग, प्रशासन व पोलिस या सर्वांच्या लेखी तो गुन्हा असला तरी तो शेतकऱ्यांसाठी अखेरचा उपाय असतो. यात दोष कोणाचा? हा प्रश्‍न कधीच न सुटणारा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two brother lost their lives to save the crop