Video : पीकसंरक्षणासाठी चक्क शेतीला लावले साड्यांचे कुंपण; गिरीधर वसाके यांची अभिनव शक्कल

रवींद्र कुंभारे
Wednesday, 18 November 2020

साड्यांच्या कुंपणामुळे पिकांचे वन्यप्राणी आणि मोकाट जनावरांपासून कोणतेही नुकसान न होता कापूस, तूर, पालक, मेथी, सांबार, चवळी, कांदे, कोबी, वांगे, मुळा यासारखे पीक दोन एकर शेतीत घेण्याचा प्रयोग वसाके यांनी यशस्वी करून दाखविला. गिरीधर यांची साड्यांच्या कुंपणाची शक्कल सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.

गुमगाव (जि. नागपूर) : पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतातील उभ्या पिकांची सुरक्षा करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला अक्षरशः फेस येतो. वन्यप्राणी आणि मोकाट जनावरे शेतात येऊन नुकसान करू नये, यासाठी हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील शेतकऱ्याने शेतीला चक्क रंगबिरंगी साड्यांचे कुंपण करण्याची नवीन शक्कल शोधून काढली. निसर्गाच्या हिरव्या रंगात हे रंगबिरंगी कुंपण लक्षवेधी ठरत आहे.

शेतातील पिकांचा वन्यप्राणी आणि मोकाट जनावरांपासून बचाव व्हावा यासाठी गुमगाव येथील गिरीधर गजानन वसाके (वय ५५) यांनी शेताचे बांध रंगबिरंगी साड्यांनी सजविल्याचे चित्र आहे. रंगबिरंगी साड्यांचे कुंपण बघून वन्यप्राणी आणि मोकाट जनावरे शेतात शिरत नाही. साड्यांमुळे अटकाव निर्माण झाल्याने ते आपला मार्ग बदलत असल्याचे गिरीधर वसाके यांचा अनुभव आहे.

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू 

साड्यांच्या कुंपणामुळे पिकांचे वन्यप्राणी आणि मोकाट जनावरांपासून कोणतेही नुकसान न होता कापूस, तूर, पालक, मेथी, सांबार, चवळी, कांदे, कोबी, वांगे, मुळा यासारखे पीक दोन एकर शेतीत घेण्याचा प्रयोग वसाके यांनी यशस्वी करून दाखविला. गिरीधर यांची साड्यांच्या कुंपणाची शक्कल सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.

कमी किमतीचे ‘कुंपण’

मराठवाडा भागामध्ये प्रवास करीत असताना तेथील शेतकरी पीकसंरक्षणासाठी शेतीला करीत असलेल्या या प्रयोगाचे अनुकरण करताना साडीचे कुंपण करण्यासाठी गिरीधर घरातील जुन्या साड्या वापरतात. मात्र, त्या कमी पडत असल्याने कमी किमतीत मिळणाऱ्या साड्या शहरातून, गावातून विकत घेऊन त्यांचे शेतात रंगबिरंगी कुंपण करतात.

अधिक वाचा - "भूषण शहिद झाला आता दुसऱ्या मुलालाही सैन्यात पाठवणार"; दुःखात बुडालेल्या देशभक्त मातेचे उद्गार

प्राण्यांसाठी ‘नया है यह’

जनवरांपासून होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी विविध युक्त्या करून थकले आहेत. बुजगावणे, फटाके फोडणे, वाघाची डरकाळी, सोलर कुंपण, ओरडण्याचा आवाज, टेबल फॅनचे पाते आणि परात आदी पर्याय वापरले जातात. या 'आयडिया' वन्यप्राणी आणि मोकाट जनावरांना नित्याचे झाल्याने त्याचा पाहिजे तितका फायदा होताना दिसत नसल्याने साड्यांच्या कुंपणाची शक्कल सध्या प्राण्यांसाठी नवीनच असल्याने याचा फायदा होत असल्याचे वसाके सांगतात.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sari fence planted for crop protection