सहलीची रिस्क नको रे बाबा...कारण, असे की...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली काढण्यासाठी काही कठोर नियम तयार केले आहेत. सहलीसाठीच्या या नियमांमुळे शाळा कोणतीही "रिस्क' घ्यायला तयार नसल्याचे दिसते.

नागपूर : शाळा म्हणजे रोज शिकणे आणि शिकवणे. त्यातून थोडे निराळे काहीतरी म्हणजे शाळेचे स्नेहसंमेलन आणि सहल. शालेय सहल म्हणजे तर आनंदाचा ठेवा. नवीन शिकणे, नवीन अनुभवणे आणि एकमेकांना समजून घेणे. मौज-मजा आणि धमाल. मात्र शालेय सहलींचे प्रमाण दिवसेंदिवस घटते आहे आणि पर्यायाने विद्यार्थी या आनंदाला मुकत आहेत. कारण शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली काढण्यासाठी काही कठोर नियम तयार केले आहेत. सहलीसाठीच्या या नियमांमुळे शाळा कोणतीही "रिस्क' घ्यायला तयार नसल्याचे दिसते. त्यामुळेच नागपूर शहर आणि जिल्ह्यातून आतापर्यंत मोजक्‍या शाळांनीच सहलीची परवानगी घेतली असल्याचे कळते.

सविस्तर वाचा - घरी सुरू होती लग्नाची तयारी अन् कोसळले दुःखाचे डोंगर

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्याच्या शिक्षण विभागाने मागील काही वर्षांपासून शैक्षणिक सहलीसंदर्भात विविध नियम तयार केले आहेत. दोन वर्षांपूर्वी हे नियम शिथिल करण्यात आले. मात्र, यावर्षीपासून पुन्हा नव्या अटी ठेवल्या आहेत. शैक्षणिक सहलीसंदर्भात 27 नियम तयार करण्यात आले आहेत. मागील वर्षी नागपूर शहरात महापालिका तसेच खासगी शाळांनीही मोठ्या प्रमाणात सहली काढल्या होत्या. मात्र, यावर्षी द्वितीय सत्र सुरू होऊन दोन महिने झाले तरी आतापर्यंत शिक्षण विभागाकडे मोजक्‍या शाळांनीच सहलीसाठी परवानगी मागितली आहे. जाचक नियमांमुळे शैक्षणिक सहली निघालेल्या नाहीत. नव्याने आलेल्या नियमात शैक्षणिक सहल काढताना शाळेच्या मुख्याध्यापकांना व शिक्षकांना "हमीपत्र' द्यावे लागत असल्याने शाळा सहली नेण्यास टाळाटाळ करीत आहेत.

विनापरवाना सहली

सहलीसाठी जाचक अटी असल्यामुळे काही शाळा तर परवानगीविनाच कोणतेही निकष न पाळता गुपचूप सहली काढत आहेत. सहलीला निघण्यापूर्वी पालकांनी शाळेला संमतिपत्र देणे बंधनकारक आहे. मात्र, हे निकष पाळले जात नसल्याचे दिसते. तसेच काही खासगी शाळांकडून स्वत:च्या स्कूलबसचा वापर केला जात आहे. केवळ ऐतिहासिक व भौगोलिक ठिकाणीच शाळेची सहल काढावी, असा नियम आहे. मात्र, बहुतांश शाळा हे नियम पाळत नसल्याचे दिसते.

अधिक वाचा - तो पंचावन वर्षांचा ती नऊ वर्षांची अन्...

शाळांचा अल्प प्रतिसाद
गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी शालेय सहलीला अत्यंत कमी प्रतिसाद आहे. यावर्षी आतापर्यंत 25 शाळांनीच सहलीसाठी परवानगी मागितली आहे. महाराजबाग वा रामन विज्ञान केंद्र या दोनच ठिकाणी शाळांनी सहली न्याव्यात.
- चिंतामण वंजारी,
प्राथमिक शिक्षणाधिकारी.

अशा आहेत काही अटी

  • शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपर शपथपत्र
  • सरकारी बस
  • पालकांची एनओसी
  • जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षकांवर जबाबदारी
  • शैक्षणिक सहलीच काढण्यावर भर
     

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school picnic & rules