नागपूर : खामला परिसरातील सहकारनगर ते जयप्रकाशनगर मार्गावर दोन्ही बाजूला भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण करून भाजीबाजार व मटण मार्केट थाटले आहे. त्यामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे परिसरातील नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची मोठी अडचण होत आहे. महापालिका प्रशासनाने येथील अतिक्रमण हटवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी येथील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
या परिसरात गेल्या 20 वर्षांपासून नियमितपणे भाजीबाजार भरतो आहे. खरेदी करण्यासाठी परिसरातील नागरिकांची सकाळी व सायंकाळच्या सुमारास मोठी गर्दी उसळते. या मार्गावर दररोज शेकडो वाहने सुसाट वेगाने धावत असतात. लहान मुलांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुणाचेही नियंत्रण नसल्यामुळे भाजीबाजार हळूहळू आपले हातपाय पसरवित आहे. बाजाराचा सर्वाधिक त्रास परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. काही जागरुक ज्येष्ठ नागरिकांनी अनेकवेळा भाजीबाजार व मटण मार्केट हटविण्याची मनपा प्रशासनाकडे मागणी केली. त्यानंतर थातुरमातुर कारवाई होते. परंतु, दुसऱ्या दिवशी पुन्हा स्थिती "जैसे थे' होते. सोमवारी या भागावर मनपाने कारवाईचा बडगा उगारला. मात्र बुधवारी पुन्हा दुकानदारांनी आपले बस्तान मांडले.
*लॉकडाउनमुळे यांना बसणार रिव्हर्स किक ! सविस्तर वाचा*
फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
मार्केटमध्ये येणारे अनेक ग्राहक फिजिकल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे. केवळ ग्राहकच नव्हे, दुकानदारही मास्क घालताना दिसत नाही. त्यामुळे या भागात कोरोनाचा प्रसार वाढण्याची दाट शक्यता आहे.
येथील भाजी व मटण मार्केट कायमचे हटविण्यासंदर्भात आम्ही वेळोवेळी प्रशासनाला विनंती केली. कठोर कारवाई होत नसल्याने पसारा वाढतच चालला आहे. आमच्या मागणीचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा अशी अपेक्षा आहे.
-हुकुमचंद मिश्रिकोटकर, अध्यक्ष, सहकारनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ
संपादन : प्रशांत रॉय
|