आता आली का पंचाईत, वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरते की काय?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

सीबीएसई बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे, त्यांनाच परीक्षेचे प्रवेशपत्र देण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांची हजेरी कमी असेल अशा विद्यार्थ्यांची यादी विभागीय कार्यालयाकडे देण्यात येईल.

नागपूर : दहावी, बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर आल्या आहेत. अशावेळी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नोटीस काढून 1 जानेवारी 2020 मधील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागवली आहे. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे त्यांना परीक्षेत बसण्याची परवानगी देऊ नये, असेही आदेशात नमूद केले आहे.
सीबीएसई बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे, त्यांनाच परीक्षेचे प्रवेशपत्र देण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांची हजेरी कमी असेल अशा विद्यार्थ्यांची यादी विभागीय कार्यालयाकडे देण्यात येईल.

सविस्तर वाचा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी थेट घरीच

देशातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्के असणे अनिवार्य असते. मात्र, अनेकदा त्याकडे कानाडोळा करीत विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेत शाळेकडून मुभा दिली जाते. यासाठी अटेडन्स रजिस्टरमध्येही हेरफेर केला जातो. त्यामुळे सीबीएसईने अटेंडन्स रजिस्टरवरील विद्यार्थ्यांच्या हजेरीची यादीही मागविली आहे. या यादीवर 7 जानेवारी रोजी अंतिम निर्णय होईल. योग्य कारणास्तव विद्यार्थी गैरहजर राहिला असेल तर त्या विद्यार्थ्याला पुरावे सादर करण्यास सांगितले जाईल.

उत्तर देणे बंधनकारक
नोटिसीनुसार दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांना उत्तर देणे बंधनकारक आहे. जर मुदतीत विद्यार्थ्यांकडून खुलासा आला नाही तर त्यांना परीक्षेस बसण्यास मज्जाव केला जाणार आहे. सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारी 2020 पासून सुरू होऊन 20 मार्च 2020 पर्यंत चालणार आहे. तर बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून 30 मार्चपर्यंत राहील.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seventy five percent presenty is requiresd for examination