ठोसे लगावत तिने गाठले यशोशिखर

नागपूर : मोठा भाऊ साकिबसोबत घरी सराव करताना अल्फिया पठाण.
नागपूर : मोठा भाऊ साकिबसोबत घरी सराव करताना अल्फिया पठाण.

नागपूर : आईवडील आपल्या मुलींना सहसा घराबाहेर पाठवताना बराच विचार करतात. खेळामध्ये पाठविताना तर ते खोलवर विचार करतात. मात्र, शहर पोलिस दलात कार्यरत एका पोलिस कर्मचाऱ्याने मुलीला चक्क बॉक्‍सिंगसारख्या खेळात पाठविण्याचा धोका स्वीकारला. मुलीनेही दिवसरात्र कठोर परिश्रम करून अवघ्या सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी पदक जिंकत आईवडिलांचा विश्वास सार्थ ठरविला. शिवाय देशातील "नंबर वन' खेळाडूचाही मान मिळवला.


युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत ठरलेली ही खेळाडू आहे आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धा अल्फिया पठाण. अल्फिया सुरुवातीला मानकापुरात बॅडमिंटन, स्केटिंग व थ्रो इव्हेंट खेळायची. याच ठिकाणी इनडोअर स्टेडियममध्ये तिचा मोठा भाऊ साकीब मुष्टियुद्धाचा सराव करायचा. प्रॅक्‍टिस संपल्यानंतर वडिलांसोबत स्टेडियममध्ये यायची. भावाला प्रतिस्पर्ध्यावर ठोसे लागवताना पाहायची. अल्फियाला हा खेळ मजेशीर वाटला. साकिबचे प्रशिक्षक गणेश पुरोहित यांनी तिला विचारणा केली. तिने होकारार्थी मान डोलवत पापाकडे (अक्रम पठाण) बोट दाखविले. आमच्या समाजात मुली अशाप्रकारचा खेळ खेळत नाहीत, असे सांगून वडिलांनी वेळ मारून नेली. मात्र, पुरोहित यांना तिच्यात भविष्यातील खेळाडू दिसत होता. अखेर प्रशिक्षकाच्या आग्रहास्तव वडिलांनी होकार दिला आणि अल्फियाच्या मुष्टियोद्धा होण्याचा अडथळा दूर झाला.

केवळ दोन-तीन महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर पुरोहित यांनी अल्फियाला थेट राज्य स्पर्धेत उतरविले. उल्लेखनीय म्हणजे पहिल्याच स्पर्धेत अल्फियाने सुवर्णपदक जिंकले. जिल्हा, विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकण्याचा सपाटा लावत ती सोळाव्या वर्षीच आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचली. 2018 व 2019 मध्ये सर्बिया येथे झालेल्या नेशन्स कप स्पर्धेत अल्फियाने रौप्य व ब्रॉंझपदक जिंकले. गतवर्षी दुबईत खेळल्या गेलेल्या आशियाई स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली. याशिवाय कझाकस्थान व जर्मनीतील प्रशिक्षण दौऱ्याचीही (ट्रेनिंग टूर) तिला संधी मिळाली. खेलो इंडियातील सुवर्णासह राष्ट्रीय स्पर्धेतदेखील तिच्या नावावर सात पदके आहेत. ज्युनिअर गटात सध्या भारतात अव्वल स्थानावर असलेल्या अल्फियाला भविष्यात युवा व त्यानंतर सीनियर गटातही देशाला पदक मिळवून द्यायचे आहे. विशेषतः ऑलिम्पिक तिचे स्वप्न आहे.

अवस्थीनगर येथे राहणाऱ्या 17 वर्षीय अल्फियाचे दोन्ही भाऊ राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू व पदकविजेते आहेत. थोरला साहिल ऍथलिट, तर दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ (साकिब) मुष्टियोद्धा आहे. लॉकडाउनमुळे सध्या रोहतक अकादमी बंद असल्यामुळे अल्फिया घरीच साकिबसोबत सराव करीत आहे.

अल्फिया खूप मेहनती, हुशार आणि ताकदवान आहे. कोणतीही गोष्ट ती पटकन आत्मसात करून रिंगणात प्रभावीपणे अंमलबजावणी करते. तिच्या आतापर्यंतच्या यशाचे हेच गमक आहे. अल्फियाची झपाट्याने होत असलेली प्रगती बघता सिनियर गटातही ती चांगली कामगिरी करेल, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही'
गणेश पुरोहित, अल्फियाचे प्रशिक्षक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com