राजकारण : शिवसेनेत काँग्रेसी कल्चरचा शिरकाव; निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता, वाचा...

राजेश चरपे
Thursday, 13 August 2020

नव्या दमाचे तसेच युवा नेते दुष्यंत चतुर्वेदी सर्वांना एकत्रित करून शिवसेना भवनात आणतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्यांनी भवनाऐवजी बंगल्याला प्राधान्य दिले.

नागपूर : उच्चशिक्षित नेत्यांच्या आगमानमुळे शिवसैनिकांच्या बैठका आता शिवसेना भवनाऐवजी बंगल्यात होऊ लागल्या आहेत. शिवसेनेतही काँग्रेसी कल्चरचा शिरकाव होऊ लागल्याने उपराजधानीतील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे.

शिवसेनेचे आमदार तसेच नागपूर शहराचे नवनियुक्त संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांनी दोन दिवस शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांच्या आढावा बैठकी त्यांच्या करोडपती गल्लीतील बंगल्यात घेतल्या. सर्व पदाधिकाऱ्यांची ओळख तसेच विधानसभानिहाय महापालिकेच्या निवडणुकीची चाचपणी यात करण्यात आली. बैठकीला सर्वच आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.

ठळक बातमी - बापाची मुलीला आर्त विनवणी, 'बेटा मला येथून काढ, नाही तर मी मरून जाईन, मला जगायचे आहे तुमच्यासाठी'

नागपूरमध्ये शिवसेनेची दोन भवने आहेत. रेशीमबाग येथील भवन अनेक वर्षे बंद होते. ते ताब्यात घेण्यावरून यापूर्वी राडेही झाले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी किशोर कुमेरिया यांनी ते सुशोभित केले. दुसरे भवन बैधनाथ चौकात असून त्याचा वापर फारसा होताना दिसत नाही. जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनी काही बैठका येथे घेतल्या. महापालिकेच्या निवडणुकीत या भवनाचा वापर झाला होता. नव्या दमाचे तसेच युवा नेते दुष्यंत चतुर्वेदी सर्वांना एकत्रित करून शिवसेना भवनात आणतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्यांनी भवनाऐवजी बंगल्याला प्राधान्य दिले.

आमचा नाइलाज होता

नेत्यांची मर्जी सांभाळावी लागते. त्यामुळे बंगल्यात बैठकीला जावे लागले. शिवसेना भवनात बैठक झाली असती तर अधिक मोकळेपणाने बोलता आले असते. आमचा नाइलाज होता, असे नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर एका माजी पदाधिकाऱ्याने सांगितले.

जाणून घ्या - ‘बाळा... आईची काळजी घे, आता तुलाच सांभाळायचे आहे' वडिलांचे हे वाक्य मुलाला समजलेच नाही अन्...

पावलावर पाऊल

माजी पालकमंत्री, काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी यांनीही काँग्रेसचे स्वतंत्र कार्यालय उघडले होते. माजी खासदार विलास मुत्तेमवार गटाशी वाद झाल्यानंतर त्यांनी देवडिया काँग्रेस भवनमध्ये जाणे टाळले. त्याऐवजी एचबी टाऊन येथे काँग्रेसच्या बैठका घेतल्या जात होत्या. राज्यातील आणि केंद्रातील अनेक नेतेही त्यावेळी त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहत होते. त्यांच्या समर्थकांच्या महापालिकेच्या उमेदवारांच्या मुलाखती व एबी फॉर्मचे वाटपही येथूनच केले जायचे. यावरून अनेकदा वादही झाले. मात्र, देवडियात त्यांनी पाय ठेवला नाही. निवडणुकी दरम्यान राज्याचे निरीक्षक आले असतानाही त्यांनी देवडियात येणे टाळले. तसेच आपल्या समर्थकांनाही जाऊ दिले नव्हते. त्यामुळे सदर येथील एका हॉटेलमध्ये काँग्रेसची बैठक घेण्यात आली होती.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena loyalists are upset by the Congress culture