तब्बल २०० दुकानदारांचा अतिक्रमण पथकाला घेराव; वेळीच केले पोलिसांना पाचारण; मोठा अनर्थ टळला 

राजेश प्रायकर 
Saturday, 7 November 2020

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून वाहतुकीस अडथळा ठरत असलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर धरमपेठ झोनअंतर्गत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रामगिरी परिसरातील हटविण्यात आले.

नागपूर ः रस्त्यावर दुकाने थाटून वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकाला आज दोनशे दुकानदारांनी घेराव केला. त्यामुळे अधिकारी व दुकानदारांत वाद निर्माण झाला. अखेर पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आल्याने पुढील संघर्ष टळला. पोलिसांच्या गर्दीमुळे टीव्ही टॉवर परिसराला छावणीचे स्वरुप आले होते.

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून वाहतुकीस अडथळा ठरत असलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर धरमपेठ झोनअंतर्गत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रामगिरी परिसरातील हटविण्यात आले. त्यानंतर पथक टीव्ही टॉवर परिसरात कारवाईसाठी पोहोचले. कारवाईस पुढाकार घेताच या परिसरातील दोनशे लोकांनी अतिक्रमणविरोधी पथकाला विरोध केला. 

सविस्तर वाचा - विश्वास बसेल का! एका उंदीरमुळे वृद्धेचे कुटुंब आलं उघड्यावर

एवढेच नव्हे पथकातील कर्मचाऱ्यांनाही घेराव केला. दुकानदारांंनी शिविगाळ केली, त्यामुळे तणाव निर्माण झाला. अखेर मनपा अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केली. पोलिसांची मोठी कुमक आल्यानंतर मनपा अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला. त्यानंतर पथकाने या परिसरात कारवाई करीत रस्त्यापर्यंत आलेले दुकानांचे २७ शेड तोडले. ३ ओटे, २ चिकनची दुकाने तोडण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे पाच ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. 

गांधीबाग झोनमध्येही महाल, शिवाजी पुतळा, नंगा पुतळापर्यंत कारवाई करण्यात आली. येथे एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले असून दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एवढेच नव्हे केळीबाग रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरत असलेल्या हनुमान मंदिरातील मूर्ती काढण्याचेही काम सुरू करण्यात आले. ही कारवाई सहायक आयुक्त अशोक पाटील, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, प्रवर्तन निरिक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

अधिक वाचा - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

कॉंग्रेसच्या नगरसेवकाकडूनही विरोध

अतिक्रमण कारवाईस पोहोचलेल्या पथकाला विरोध करण्यासाठी कॉंग्रेसचे एक नगरसेवकही येथे पोहोचल्याचे सुत्राने नमुद केले. अतिक्रमण कारवाईत विरोध करणाऱ्या नगरसेवकाला कारवाईची भीती दाखविल्याने त्यांनी माघार घेतली. त्यानंतर कारवाई सुरळीत पार पडली. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shopkeepers were trying to attack on Encroachment force in nagpur