धक्कादायक... तब्बल एक हजार ग्राहकांची फसवणूक, या डेव्हलपर्सपासून रहा सावध...

अनिल कांबळे 
Tuesday, 4 August 2020

कंपनीच्या मार्फत वर्धेतील समुद्रपूर तालुक्यातील शिवनी येथे सुमारे ४० एकर शेतात ॲलोविराची शेती करण्यात येऊन त्याचे जेल आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करण्यात येणार आहे. ग्राहकांना दर वर्षाला दोन लाख रुपयांचा परतावा देण्यात येईल, अशा आशयाची जाहिरात केली. 

नागपूर : शेतात ॲलोविराचे उत्पादन घेऊन दर महिन्याला दोन लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे एक हजार ग्राहकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी श्री गोविंदा डेव्हलपर्स ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर व सुपेरियर ॲग्रो फार्मिंग ॲण्ड कल्टिवेअर्स लिमिटेड कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून तीन संचालकांना अटक केली. 

विजय आनंदराव शेळके (वय ५०, रा. मेहर रेसिडेन्सी, खामला) व महेंद्र तुळशीराम गवई (रा. कुकडे ले-आऊट) अशी अटकेतील संचालकांची नावे आहेत. तिघांनी कंपनीच्या मार्फत वर्धेतील समुद्रपूर तालुक्यातील शिवनी येथे सुमारे ४० एकर शेतात ॲलोविराची शेती करण्यात येऊन त्याचे जेल आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करण्यात येणार आहे. ग्राहकांना दर वर्षाला दोन लाख रुपयांचा परतावा देण्यात येईल, अशा आशयाची जाहिरात केली. 

क्लिक करा -  नागपुरात डबल मर्डरचा थरार! पत्नीच्या अनैतिक संबंधावरून झाला वाद.. अखेर त्याने हाती घेतली कुऱ्हाड आणि...
 

या योजनेत रेल्वेत कार्यरत उल्हास नामदेवराव देशमुख (वय ५३, रा. श्रीरामननगर, मानेवाडा) यांनी सात लाख ३४ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मुदत पूर्ण झाल्यानंतरही त्यांना दोन लाख रुपये मिळाले नाही. त्यांनी पैसे परत मागितले असता तिघांनी त्यांना पैसे परत केले नाही. देशमुख यांनी आर्थिक गुन्हेशाखेत तक्रार केली. 

पोलिस निरीक्षक बबन येडगे, सहाय्यक निरीक्षक अमर काळंगे, गजानन मोरे, मनोज सोनवणे, भूषण उद्धार, भरत ठाकूर, ज्वाल मेश्राम, भारती माडे यांनी तिघांविरुद्ध सोनेगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. तिघांना अटक करून त्यांची पोलिस कोठडी घेतली. या योजनेत एक हजार गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. फसवणुकीचा आकडा कोट्यवधीचा घरात आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी सिव्हिल लाइन्समधील प्राशासकीय इमारत क्रमांक एक मधील आर्थिक गुन्हे शाखेतील कार्यालयात संपर्क साधावा,असे आवाहन पोलिस निरीक्षक बबन येडगे यांनी केले आहे.
 

प्रकृती खालावून तिघांचा मृत्यू 

नागपूर : वेगवेगळ्या घटनांमध्ये प्रकृती खालावल्याने तिघांचा मृत्यू झाला. पहिल्या घटनेत कळमना हद्दीत आशापुरा बिल्डींगजवळ, सूर्यनगर निवासी जयपाल बद्रीनाथ सूद (72) यांची सोमवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास प्रकृती खालावली. त्यांना उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत लकडगंज हद्दीत बाभुळबन, गरोबा मैदान निवासी शैलेष गोमती मेश्राम (48) यांनी गेल्या शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक प्रकृती खालावली. त्यांना उपचारार्थ जवळच्या खासगी रुग्णालयात नेले असता मेडिकल रुग्णालयात रेफर करण्यात आले. मेडिकलमध्ये उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत पाचपावली हद्दीत मिलिंदनगर निवासी सचिन छगनलाल खापर्डे (43) यांना प्रकृती खालावल्याने उपचारार्थ मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तिन्ही प्रकरणात मिळालेल्या सूचनेवरून संबंधित ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 
 

साप चावल्याने तरुणीचा मृत्यू 

नागपूर : पारडी ठाण्यांतर्गत एका तरुणीचा सर्प दंशामुळे मृत्यू झाला. मृतक उमिया धाम निवासी चंद्रकली कपिराम बंजारे (१८) आहे. रविवारी सायंकाळी ती न्यू विदर्भ ट्रेडिंग कंपनीच्या परिसरात बसली होती. या दरम्यान तिच्या उजव्या हाताचा सापाने चावा घेतला. तिची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी तिला उपचारार्थ मेयो रुग्णालयात भरती केले. तिची प्रकृती नाजूक होती. शरीरही निळे पडले होते. सोमवारी सायंकाळी चंद्रकलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी कुटुंबीयांच्या सूचनेवरून अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri Govinda Developers cheated one thousand citizens