Video : टार्गेट-२०२१ : खेळाडू कधीच हिंमत हारत नसतो; वाचा शुभांगी राऊतच्या भावना

नरेंद्र चोरे
Tuesday, 22 December 2020

पुढील वर्षी आशियाई कॅडेट ज्यूदो स्पर्धा होणार आहे. त्याअगोदर राष्ट्रीय स्पर्धा आहे. त्यात उत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास पुढे राष्ट्रकुल व ऑलिम्पिकचीही संधी मिळू शकते. ते सोपे नाही, मात्र अशक्यही नाही.

नागपूर : कोरोना असो वा अन्य कोणतेही संकट. खेळाडू कधीच हिंमत हारत नसतो. कोरोनाने काही महिने आमची परीक्षा अवश्य घेतली. मानसिक त्रासही झाला. परंतु, कोरोना गेल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने सरावाला सुरुवात करून स्वप्नपूर्तीच्या दिशेने जिद्दीने वाटचाल करू, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय महिला ज्युदोपटू शुभांगी राऊतने आपल्या भावना व्यक्त केल्या.

शुभांगी म्हणाली, संपूर्ण वर्ष सर्वसामान्यांसह खेळाडूंचीही परीक्षा घेणारे ठरले. कोरोनामुळे या वर्षात ना प्रॅक्टिस झाली, ना ही स्पर्धा. त्यामुळे माझ्यासह सर्वच खेळाडूंना खूप त्रास झाला. वर्ष संपत आलंय. मात्र, स्पर्धा होणार की नाही, याबद्दल अजूनही अनिश्चिततेचे वातावरण आहे.

हेही वाचा - सालेकसातील शेतात आढळला मांजरीसारखा दिसणारा प्राणी; जवळ जाऊन बघितले असता अंगाचा उडाला थरकाप

लॉकडाऊन काळात सराव पूर्णपणे बंद होता. त्यामुळे घरीच वर्कआऊट करावा लागला. अनलॉकमध्ये राज्य सरकारने इनडोअर खेळांना परवानगी दिली. परंतु, ज्युदोमध्ये थेट संपर्क येत असल्यामुळे अजूनही नियमित सराव सुरू होऊ शकला नाही. प्रॅक्टिसअभावी वजन वाढून फिटनेसवर परिणाम झालेला आहे.

शुभांगीला नववर्षात परिस्थिती बदलण्याची आशा आहे. त्यामुळे तिने आपले सर्व लक्ष भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर केंद्रित केले आहे. पुढील वर्षी आशियाई कॅडेट ज्यूदो स्पर्धा होणार आहे. त्याअगोदर राष्ट्रीय स्पर्धा आहे. त्यात उत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास पुढे राष्ट्रकुल व ऑलिम्पिकचीही संधी मिळू शकते. ते सोपे नाही, मात्र अशक्यही नाही.

अधिक माहितीसाठी - लग्नाला यायचं बरं का! असं म्हणत दिलं लग्नाचं 'ओलं' निमंत्रण; पत्रिका बघून भलभल्यांना बसला धक्का

त्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता आहे. तशी माझी मानसिक तयारीदेखील आहे. सोमवारी क्‍वार्टर येथे राहणाऱ्या शुभांगीने संघर्ष जवळून पहिला व अनुभवला आहे. वडील सुभाष राऊत यांनी बुधवार बाजारात लिंबू, अद्रक व लसूण विकून आपल्या तीन मुलींना घडविले आहे. मुलींनी क्रीडा क्षेत्रात गरुडझेप घेऊन आईवडिलांच्या मेहनतीचे चीज केले.

एस. बी. सिटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या २१ वर्षीय शुभांगीने गुवाहाटी व भूवनेश्वर येथे झालेल्या ‘खेलो इंडिया’ क्रीडा महोत्सवात रौप्यपदके जिंकले आहे. शिवाय दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेतही तिने ब्रॉंझपदकाची कमाई केली. राष्ट्रीय स्तरावरील चमकदार कामगिरीनंतर २०१६ मध्ये कोची (केरळ) येथे झालेल्या आशियाई ज्यूदो स्पर्धेत तिला भारताचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली.

सविस्तर वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज

पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरणार
अचानक आलेल्या या संकटाने खेळाडूंचे एकूणच आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकले आहे. सध्याच्या अनिश्चिततेमुळे थोडी चिंतीत अवश्य आहे. पण नाउमेद नाही. हे संकट दूर झाल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे.
- शुभांगी राऊत

संपादन - नीलेश डाखोरे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shubhangi raut says The player never loses courage