
प्रबोधनात्मक संदेश देणाऱ्या लग्नपत्रिका सर्वांनी बघितल्या असतील. मात्र, जिल्ह्यातील बल्लारपूर येथील एका कुटुंबानं लग्नाच्या पत्रिकेतून थेट दारूची बाटली आणि चकणा पाठविला आहे.
चंद्रपूर : लग्न म्हंटलं की डोळ्यासमोर येतात निरनिराळ्या रंगाच्या श्रीगणेशाचे मनमोहक चित्र असणाऱ्या आणि सुंदर आकार असलेल्या लग्नपत्रिका. लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिकांवर अतोनात खर्च केला जातो. त्यात पत्रिका जितकी आकर्षक तितकी किंमतही जास्त. अगदी ५ रुपयांपासून तर लाखो रुपयांपर्यंतच्या लग्नपत्रिका बाजारात उपलब्ध असतात. पण तुम्ही कधी लग्नाचं ओलं निमंत्रण देणारी पत्रिका बघितली आहे का? चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरात सध्या या अनोख्या पत्रिकेची प्रचंड चर्चा आहे.
प्रबोधनात्मक संदेश देणाऱ्या लग्नपत्रिका सर्वांनी बघितल्या असतील. मात्र, जिल्ह्यातील बल्लारपूर येथील एका कुटुंबानं लग्नाच्या पत्रिकेतून थेट दारूची बाटली आणि चकणा पाठविला आहे. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर समाज माध्यमात उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहेत.विशेष म्हणजे, दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारूचा पुरवठा करणारी आगळीवेगळी पत्रिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
जाणून घ्या - काम करताना लघुशंकेसाठी गेलेली महिला परतलीच नाही; आरडाओरड होताच बसला धक्का
दारूबंदी असतानाही....
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीला पाच वर्षे पूर्ण झाली. मात्र, जिल्ह्यातून पूर्णपणे दारूबंदी करण्यात शासन, प्रशासनाला अपयश आले आहे. शहरापासून गावखेड्यापर्यंत खुलेआमपणे दारूविक्री केली जात आहे. अल्पावधीत पैसे कमाविण्याच्या नादात या व्यवसायात अनेकजण उतरत आहेत. यात अल्पवयीन मुले, महिलाही मागे राहिलेल्या नाहीत.
राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त मिळवित अनेकजण राजरोसपणे हा व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदीचा पूरता फज्जा उडाल्याचे दारूबंदी विरोधकांकडून बोलले जाते. यातूनच जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याची मागणी समोर आली. खुद्द पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही जिल्ह्यातील दारूबंदी उठविणार असल्याचे अनेकदा जाहीरपणे सांगितले.
पत्रिकेत दारूची बाटली आणि चकणा
अशात बल्लारपूर येथील एका मोठ्या गडगंज कुटुंबात १५ डिसेंबरला लग्नसोहळा पार पडला. दुसऱ्या दिवशी स्वागत समारोहही झाला. त्यानंतर या कुटुंबीयांनी वितरित केलेल्या लग्नाच्या पत्रिकेचा व्हिडिओ व्हायरल झाला. यात निमंत्रण देणारी पत्रिका, त्याच बॉक्समध्ये एक दारूची, पाण्याची बाटल सोबत चकना असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जिल्ह्यातील दारूबंदीला आव्हान देणाराच ठरला आहे. पोलिस विभागाकडून या व्हिडिओची सतत्या पडताळून बघितली जाणार असल्याची माहिती आहे.
संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ